पोलिओ आणि कॅन्सरही त्यांच्या जिद्दीपुढे जिंकू शकले नाही...
काही लोक छोट्या छोट्या समस्यांमुळे हार पत्करतात. पण काही लोक स्वतःच्या अडचणींवर फक्त मातच करत नाहीत तर ते इतरांना मदत करून उभे राहण्यास साथ देतात व आपली एक वेगळी ओळख निर्माण करतात. के. व्ही. रुबिया त्यातल्याच एक. भारत सरकारच्या २०२२ च्या पद्म पुरस्कार यादीत अनेक महिलांचा समावेश आहे. या महिलांनी वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. यातील काही महिलांनी आपले संपूर्ण जीवनच संस्कृती, पर्यावरण व सामान्य लोकांसाठी समर्पित केलेले आहे. केरळमधील के. व्हि. रुबिया त्यातल्याच एक. दोन्ही पायांनी चालू न शकणाऱ्या रुबिया व्हील चेअरवर फिरून लोकांना एक वेगळीच प्रेरणा देतात. सरकारने त्या पद्मश्री हा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे, पण त्यांचा जीवन प्रवास अत्यंत खडतर आहे. जीवनाच्या प्रवासात के. व्ही. रुबिया यांना पायांनी साथ दिली नाही पण मजबूत आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी स्वतःला कधी आपले ध्येय गाठण्यापासून रोखू दिले नाही.
दोन्ही पाय निकामी व पुन्हा-पुन्हा झालेले अपघातानंतरही त्यांनी जे कार्य केले आहे ते खरोखरच प्रेरणादायक आहे. म्हणून यंदाचा पद्मश्री सन्मान रुबिया यांच्यापर्यंत पोचला आहे. त्यांच्या कार्यामुळे त्या बऱ्याच जणांच्या ‘रोड मॉडेल ठरल्या आहेत. दोन्ही पाय निकामी झाले म्हणून त्या नाउमेद झाल्या नाहीत. उलट जसं कळायला लागलं तेव्हापासून त्या समाजकार्यामध्येच मग्न झाल्या.
केरळमध्ये साक्षरता मिशनचं काम सुरू झालं, तेव्हा त्यांनी त्या कामाला वाहून घेतलं आणि त्या साक्षरतेच्या दूतच बनल्या. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना साक्षर करण्यासाठी त्यांनी जास्त मेहनत घेतली. नंतर केवळ साक्षरता पुरेशी नाही, तर इतर प्रकारचं शिक्षण आणि कौशल्यविकासाची गंगा तळागाळापर्यंत पोचवली पाहिजे, हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी त्या दिशेनं कार्य सुरू केलं. ‘चलानम’ नावाची संस्था त्यांनी त्यासाठी स्थापन केली आणि तिच्यामार्फत त्या काम करतात. कौशल्यविकासावर त्यांनी भर ठेवला आहे. आपल्या या सगळ्या आयुष्याबाबत त्यांनी ‘स्वप्नांगलक्कू चित्रकुकालंद’ या नावाचं आत्मचरित्रही लिहिलं आहे.
पोलिओने दोन्ही पाय निकामी झालेले असतानाही रुबिया यांनी स्वतःला दुसऱ्यांपेक्षा कमी लेखले नाही. त्यांच्या धौर्याला संपूर्ण देश सलाम करत आहे. व्हील चेअरवरून आपली लढाई लढणाऱ्या रुबिया यांची म्हणून तर पद्मश्री सन्मानासाठी सरकारने निवड केली.