चीन हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश. चीनची लोकसंख्या दीड अब्जांकडे वाटचाल करत असली तरी लोकसंख्या नियंत्रणाच्या कठोर धोरणामुळे लोकसंख्या वाढीचा दर कमालीचा मंदावला आहे. गेल्या वर्षी म्हणजे २०२१ मध्ये अख्ख्या चीनची लोकसंख्या फक्त पाच लाखांनी वाढली. सलग पाचव्या वर्षी चीनचा जन्मदर कमी नोंदविला गेला आहे. चीनची लोकसंख्या २०२० मध्ये एक अब्ज ४१ कोटी २० लाख होती. ती २०२१ मध्ये एक अब्ज ४१ कोटी २६ लाख झाली, अशी माहिती चीनच्या राष्ट्रीय सांख्यिकी ब्युरोने दिली. प्रचंड लोकसंख्येमुळे धास्तावलेल्या या हुकूमशाही देशाने कठोर लोकसंख्या धोरण अमलात आणले पण आता तेच बूमरँग होऊन उलटत आहे.
चीनमध्ये १९४९ मध्ये कम्युनिस्ट पक्षाची सत्ता आली. त्यानंतर १९७९मध्ये आपल्या देशाची लोकसंख्या प्रचंड वाढत असल्याचे या पक्षाच्या लक्षात आले. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी वन चाइल्ड पॉलिसी धोरण हाती घेण्यात आले. चीनमध्ये लोकांना मोठ्या कुटुंबात राहण्याची सवय होती. या धोरणामुळे कुटुंबांचा आकार कमी झाल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. या धोरणानंतर जन्मलेल्या नव्या पिढीला मोठ्या कुटुंबाची सवय राहिलीच नाही. त्याचप्रमाणे मामा, मावशी, काका, चुलत भाऊ- बहिण आदी नातीही अनुभवता आली नाहीत. शिवाय नवीन पिढीतील मुले निराशावादी झाली. त्याचप्रमाणे अनेक जोडप्यांना मुले होत नसल्याने व त्यांना या धोरणामुळे मुलं दत्तक घेता येत नसल्यानेही समस्या निर्माण झाली.