सोने म्हणजे भारतीयांचा विशेषत: महिलांचा आवडता विषय. जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतीय सोन्यावर अधिक प्रेम करतात. लग्नासारख्या मोठ्या समारंभापासून छोट्या कार्यक्रमापर्यंत सोन्याचे दागिने घातल्याशिवाय महिलांची हौस फिटत नाही. जगभरात सोन्याच्या अनेक खाणी असून त्यातून या मौल्यवान धातूचे उत्पादन घेतले जाते. गेल्या वर्षी उत्तर प्रदेश मध्ये सोन्याच्या दोन खाणी सापडल्या. सोनभद्र जिल्ह्यातील सोन टेकडीवर सोन्याची खाण सापडली. या टेकडीवर जवळपास तीन हजार टन आणि हरदी भागात साडेसहाशे किलो सोने असल्याची पुष्टी तज्ज्ञांनी केली. दक्षिण आफ्रिकेतील सोन्याच्या खाणी जगात सर्वाधिक खोल आणि सर्वांत जुन्या मानल्या जातात. जगातील प्रमुख सोन्याच्या खाणी विषयी जाणून घेऊया.
चिली : जगातील पाच सर्वांत मोठ्या सोन्याच्या खाणीत येथील नॉर्थ एबेरेटो खाण पाचव्या क्रमांकावर आहे. या खाणीत जवळपास २.३२ कोटी औंस सोनं आहे. औंस हे सोने मोजण्याचे एकक परिमाण असून एक औंस म्हणजे २८ ग्रॅम सोने होय.
पापुआ न्यू गिनी : येथील लिहिर गोल्ड खाण जगात चौथ्या क्रमांकावर आहे. या खाणीत २.४० कोटी औंस सोने आहे.
रशिया : रशियातील सबियामधील ओलंपियाड ही सोन्याची खाण जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी सोन्याची खाण आहे. या खाणीत सोन्याचा तब्बल ३.२० कोटी औंस इतका सोन्याचा साठा आहे.
इंडोनेशिया : ग्रासबर्गमधील सोन्याची खाण जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. या खाणीत २.६० कोटी औंस सोने आहे. जवळपास २० हजार कामगार या खाणीतून सोने काढण्यासाठी काम करतात. डच वैज्ञानिकांनी १९३६ मध्ये या खाणीचा शोध लावला. सोन्यासाठी या खाणीवर काहीवेळा हल्लेही करण्यात आले. त्यापैकी १९७७ मध्ये केलेल्या मोठ्या हल्ल्यात सुमारे ८०० जण ठार झाले होते.
दक्षिण आफ्रिका : या देशात जगातील सर्वात मोठी सोन्याची खाण आहे. साऊथ डीप गोल्ड नावाच्या या सोन्याच्या खाणीत सुमारे ३.२८ कोटी औंस सोने आहे.