इंडोनेशियाची राजधानी जाकार्ता नव्हे नुसानतारा
- मंजुषा कुलकर्णी
जाकार्ता : इंडोनेशियाची राजधानी जकार्ता समुद्राखाली बुडण्याचा धोका लक्षात घेऊन येथील सरकारने दूरदृष्टी ठेवून राजधानी बदलण्याचा निर्णय घेतला आहे. नुसानताराला राजधानीचा दर्जा देणारा कायदा संसदेत मंजूर झाला आहे.
‘वर्ल्ड सिटी ऑफ ऑल’
भविष्यातील इंडोनेशियाची परिस्थिती लक्षात ठेऊन राजधानी बदलण्याचा निर्णय घेतला असून जाकार्ताऐवजी नुसानताराची निवड केली असल्याची माहिती इंडोनेशियाच्या सरकारने एका निवेदनातून दिली आहे. राजधानीचे प्रारंभिक स्थलांतर २०२२ ते २०२४ या काळात सुरू होईल. पुढील दशकात सरकारचे मुख्य केंद्र बदलेल आणि २०४५ पर्यंत ‘वर्ल्ड सिटी ऑफ ऑल’ (सर्वांसाठी जागतिक शहर) दृष्टीस पडेल, असा दावा सरकारने केला आहे. नव्या राजधानी कायद्यामुळे इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो यांच्या महत्त्वाकांक्षी ३२ अब्ज डॉलरच्या महाप्रकल्पाला कायदेशीर पाठबळ मिळाल्याचे समजले जात आहे. ‘‘राजधानी स्थलांतराचा निर्णय २०१९मध्येच झाला असता, पण कोरोनामुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडली, असे स्पष्टीकरण विडोडो यांनी केले आहे. तर नवी राजधानी मध्यवर्ती व देशाच्या अस्मितेचे प्रतीक असेल. तसेच नवे आर्थिक केंद्र असेल, असा विश्वास इंडोनेशिया नियोजन मंत्री सुहार्सो मोनोआर्फा यांनी व्यक्त केले आहे.