मुंबई : साधारण ८ ते ९ वर्षाचा अनय. आई वडील दोघेही डॉक्टर आणि अत्यंत चांगल्या स्वभावाची म्हणावी अशी माणसं. पण अनय मात्र तसा नाही. चार मुलांमध्ये खेळायला गेल्यावर अनयला बाकीच्या मुलांना त्रास द्यायला, त्यांच्या खोड्या काढायला खूप आवडते. त्यांच्यापेक्षा लहान मुलांना तो सतत काही ना काही कारणाने त्रास देतो. कधी कोणाला खेळायलाच न घेणे, कधी कधी वाईट बोलणे, खोटे बोलणे, कधी कधी मुलांना मारणे देखील.. अशाने आता तो कोणालाही खेळायला नको असतो.
ही गोष्ट त्याच्या लक्षात आल्यावर दोन गटांमध्ये भांडणे होतील असे काहीतरी वागणे, एखाद्याला उकसवणे असले प्रकार त्याने सुरू केलेत. बिल्डिंगमधील अनेक पालक त्याच्या या वागण्याला वैतागले आहेत. एक दोनदा त्याला सांभाळणाऱ्या आजी आजोबांना देखील या बाबत सांगण्याचा एक दोन पालकांनी प्रयत्न केला पण काही फरक पडला नाही.. असं का होत असावं..?
जागतिक आरोग्य संघटनेची आकडेवारी काय सांगते?
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आकडेवारीनुसार जगातील १० ते १४ वर्षे वयोगटातील ३.६ टक्के मुलांमध्ये 'कंडक्ट डिसॉर्डर' असल्याचे आढळून आले आहे. अनेक वर्तुणुकीतील समस्यांपैकी एक असणारी ही एक वर्तुणुकीतील समस्या आहे. भारतातील डॉक्टरांच्या मते भारतात साधारण याचे प्रमाण ५ ते ८ टक्क्यांपेक्षा जास्त आहे आणि हल्ली हे जास्त दिसून येते आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या २०२१ च्या अभ्यासानुसार जगातील ७ मधील एक १० ते १९ वर्षातील किशोरवयीन आणि तरुण हा मानसिक समस्यांना समोर जात आहे. या वयोगटातील जागतिक पातळीवरील १३ टक्के मुलं या मानसिक समस्यांचे ओझे घेऊन वावरत आहेत. मुलांच्या वर्तणुकीसंदर्भातील 'कंडक्ट डिसॉर्डर' चा तर याच्याशी काही संबंध नाही ना? कंडक्ट डिसॉर्डर म्हणजे काय? आणि असेल तर यातून मुलांना बाहेर कसं काढायचं? याविषयी तज्ज्ञ काय म्हणतात?