पुणे: पुण्याच्या नेस वाडिया महाविद्यालयातून बीकॉम केलेला शुभम बिझनेस मॅनेजमेंट शिकण्यासाठी अमेरिकेला गेला. तो हेच स्वप्न घेऊन गेला की आपला अभ्यासक्रम पूर्ण झाला की तिथेच नोकरी करून अमेरिकेतच सेटल होऊया..
पण तसे काही झालेच नाही शिक्षण पूर्ण होऊन अनेक दिवस झालेत तरी एकीकडे शुभम चांगल्या नोकरीसाठी वणवण करतोय दुसरीकडे व्हिसा संपत आलाय तर त्यातच कहर म्हणजे शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाचा डोंगर वाढतच चाललाय.. भारतात शुभमचे आईवडील काळजी करत बसलेत... सगळं सोडून तू परत ये म्हणतायेत.. तर तो मात्र चांगल्या नोकरीच्या शोधात आहे..
शुभमबाबत असं का झालं असेल असे त्याला विचारले असता, शुभम म्हणतो, माझ्या काय चुका झाल्यात ते हळूहळू माझ्या लक्षात येतंय. कुठल्याही देशात शिक्षणासाठी जाण्याआधी पूर्वतयारी नीट झाली नाही तर तुमचं संपूर्ण करियर पर्यायाने तुमचं सगळं आयुष्य पणाला लागलेलं असतं.
शुभमसारखी अनेक मुलं परदेशात जेव्हा जातात तेव्हा त्यांच्यासोबत नेमकं काय होतं? परदेशात जाणं, राहणं, शिक्षण घेणं आणि नोकरी लागणं हा खरंच वाटतात तितक्या सोप्या गोष्टी आहेत का? नेमकी मुलं कुठं चुकतात? परदेशात जाण्याआधी, शैक्षणिक कर्ज घेण्याआधी, एखाद्या परदेशी विद्यापीठात प्रवेश घेण्याआधी काय पाहायला हवं जाणून घेऊया.