Marathi article about Fear and Mental health
मुंबई : भीतीपोटी 'बॉस इज अल्वेज राईट' असं म्हणून अनेक जण कामावर दिवस ढकलत असतात. सुरुवातीला गंमतीने सुरु झालेला हा प्रकार कधी कधी टोकाच्या घटनांनी हादरतो.
पुण्यात काहीच दिवसांपूर्वी एका २६ वर्षीय चार्टर्ड अकाऊंटंट मुलीचा मृत्यू झाला. तिला कामाचा ताण असल्याचा आरोप तिच्या आईवडिलांनी केला आहे. त्यानंतर आणखी एक घटना समोर आली. मॅनेजरने आजाराची सुटी मंजूर केली नाही म्हणून घाबरून एक कर्मचारी कामावर आली आणि तिचा मृत्यू झाला.
आपल्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपल्याला घाबरणे ही एक प्रकारे भारतातील अनेक वरिष्ठ अधिकारी किंवा मालकांसाठी भूषणावह गोष्ट वाटते. अनेकांना तर ही गोष्ट आपण चांगले काम करत असल्याची पावती देखील वाटते. पण खरोखरच असं काही केल्याने तुमच्या मार्गदर्शनाखाली काम करणारी माणसं तुमच्या कंट्रोलमध्ये राहतात का? आणि मुळात घाबरल्याने ते चांगलं काम करू शकतात का?
जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगातील जवळपास ६० टक्के लोकं ही कामावर (वर्किंग) आहेत. पण २०१९ च्या आकडेवारीनुसार १५ टक्के कर्मचारी हे मानसिक आरोग्याशी सामना करत आहेत. जागतिक स्तरावर, अंदाजे १२ अब्ज कामाचे दिवस दरवर्षी नैराश्य आणि चिंतेत गमावले जातात आणि उत्पादनक्षमतेमध्ये दरवर्षी १ लाख कोटी रुपये खर्च येतो.
आजचा हा दिवस (१० ऑक्टोबर) जागतिक मानसिक आरोग्य दिवस म्हणून पाळला जातो. या वर्षी जागतिक आरोग्य संघटनेने ‘कामाच्या ठिकाणचे मानसिक आरोग्य’ या संकल्पनेवर जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रत्येक वेळी मानसिक आरोग्याकडे टोकाचे नैराश्य म्हणून पाहिले जाते. पण याची सुरुवात कदाचित छोट्याश्या भीतीतून देखील झालेली असू शकते. म्हणजे काय? या भीतीवर मात करणे शक्य झाले तर कदाचित त्यातून मोठ्या समस्या जन्माला येणारच नाहीत. कामाच्या ठिकाणी, नातेसंबंधात एकुणातच तुमच्या वैयक्तिक आयुष्यात भीतीशी कसं लढायचं?
ही भीती म्हणजे काय? ही भावनिक असते की शारीरिक? मानसिक आरोग्याशी याचा काही संबंध आहे का? आजच्या या मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने या मानसिक आरोग्याची ही पहिली पायरी समजून घेण्याचा प्रयत्न करूया..