Inner Peace : स्वतःला खरोखर शांतीपूर्ण व्यक्ती कसं बनवायचं?

Peaceful World : जेव्हा कधी जगात संघर्ष भडकतो, तेव्हा लोक शांतीबद्दल बोलतात; शांतीची संस्कृती स्थापित करण्यासाठी दीर्घकालीन आणि भरीव असं काही तरी करण्याची गरज
peaceful person
peaceful person esakal
Updated on

सद्‍गुरू

आजकाल जेव्हा कधी जगात संघर्ष भडकतो, तेव्हा लोक शांतीबद्दल बोलतात. आपल्याला शांतीची संस्कृती स्थापित करण्यासाठी दीर्घकालीन आणि भरीव असं काही तरी करण्याची गरज आहे आणि ते शक्य आहे; पण ते रातोरात होऊ शकत नाही. सध्या, जगातले देश फक्त तेव्हाच शांतीबद्दल बोलतात जेव्हा ते नुकसानीच्या स्थितीत असतात. ते फायद्याच्या स्थितीत असतात, तेव्हा ते युद्ध आणि आक्रमकतेबद्दल बोलतात. आपल्याला शांती निर्माण करायची असेल, आपण शांतीच्या संस्कृतीबद्दल विचार करत असू, तर आपल्यापैकी प्रत्येकाने उचलण्याचं पहिलं पाऊल म्हणजे, स्वतःपासून सुरुवात करणं आणि स्वतःला खरोखर शांतीपूर्ण व्यक्ती कसं बनवायचं हे शोधून काढणं.

१९४५ मध्ये जेव्हा दुसरं महायुद्ध संपलं तेव्हा जगभरातील अनेक देशांनी अशी शपथ घेतली, की ते पुन्हा कधीही लढणार नाहीत आणि पाच कोटींहून अधिक लोकांना मारणारी अशी भयानक परिस्थिती निर्माण करणार नाहीत... पण वास्तविकता अशी आहे, की १९४५ पासून एक दिवसही लढाई थांबलेली नाही. जगात कुठे ना कुठे लढाई सुरू आहे. हे मानवाने स्पष्टपणे जाहीर केलं आहे, की आपण आता जसे आहोत, आपण शांतीपूर्ण राहण्यास
असमर्थ आहोत.

आजकाल जेव्हा कधी जगात संघर्ष भडकतो, तेव्हा लोक शांतीबद्दल बोलतात. आपण हे समजून घेतलं पाहिजे, की शांती ही अशी गोष्ट नाही जी आपल्याला तयार करावी लागते. संघर्ष आपली निर्मिती आहे. जर मानव या ग्रहावरून नाहीसा झाला, तर जग खूप शांत होईल. जर तुम्ही संघर्ष निर्माण केला नाही, तर शांती असणार.

आजकालच्या संघर्षांचं कारण काय आहे? संघर्ष अनेक वेगवेगळ्या पातळ्यांवर होतो. मानवा-मानवांत संघर्ष आहे, जो सगळीकडे पसरतो. कुटुंबात आणि शेजारीपाजारी खूप संघर्ष आहे - कदाचित ते बंदुका आणि बॉम्ब वापरत नसतील; पण मानवांमध्ये अनेक पातळ्यांवर घर्षण होत आहे. समुदायांमध्ये, धार्मिक गटांमध्ये, राष्ट्रांमध्ये आणि राष्ट्रांच्या गटांमध्ये नेहमीच संघर्ष होत आला आहे. संघर्ष मानवतेइतकाच जुना आहे. तो नेहमीच होता; पण आपण कायमस्वरूपी उपाय शोधला नाही. आपण नेहमी हे पाहिलं की, त्याला तात्पुरतं कसं ठीक करू शकतो. जर दोन गटांमध्ये भांडण झालं, तर ते शांती बैठक आयोजित करतात आणि समस्येवर तात्पुरता उपाय काढतात आणि पुढे जातात. याने फक्त इतकंच होतं की ते परत भडकून दुसऱ्या रूपात आणि नंतर आणखी एका स्वरूपात पुढे येतं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.