पुणे : माझ्या दिवसाची सुरुवातच मुळी आमच्या वादाने होते.. आईला बीपीचा त्रास आहे.. कधी कधी तो वाढतो देखील. पण तरीही गोळ्या संपलेलं देखील ती मला सांगत नाही. प्रत्येक गोष्टीत खर्चाच्या बाबतीत तिचा हात काहीसा आखडताच असतो.
मला हे अगदीच मान्य आहे की, सुरुवातीच्या काळात आमची परिस्थिती तितकीशी बरी नव्हती तरीही तिने खूप कष्ट घेत अत्यंत काटकसरीने संसार केला; पण आता तशी परिस्थिती नाहीये तरीही ती पैसे वाचविण्यासाठी औषधं घेणं टाळते. या गोष्टीचा मुलगा म्हणून मला प्रचंड गिल्ट येतो.. मला वाईटही वाटतं. मला असं वाटत राहतं की आधीची परिस्थिती माझ्याही हातात नव्हती किंवा त्यावेळी काही गोष्टी कळण्याचं वय देखील नव्हतं. पण आता मी व्यवस्थित कमावतो..
आमचं घरदार, पैसापाणी व्यवस्थित आहे तरीही आई जेव्हा स्वतःला कमी महत्व देते तेव्हा मला ‘हेल्पलेस’ झाल्यासारखं वाटतं. मला असं वाटतं की तिने छान राहावं, जे तिला जबाबदाऱ्यांमुळे करणे शक्य झाले नाही ते तिने आता करावं.. पण तसं काहीच होत नाही. तिचं भावनिक होणं देखील मला त्रास देतं..
मला मुलगा म्हणून ही मानसिकता काय आहे? ती अजूनही असा विचार का करते? हा प्रश्न खरोखरच समजून घ्यावासा वाटतो, केदार आपल्या आईविषयी सांगत होता.