पुणे : मी नोकरी करत करत माझं स्वतःचं यु ट्यूब चॅनेल सुरु करण्याच्या मी प्रयत्नात आहे. पण मला जे करायचंय ते शाश्वत आणि चांगलं करायचं आहे. त्यामुळेच मी ध्रुव राठी यांचा ऑनलाईन क्लास जॉईन केला आहे. खरं तर यु ट्यूब कसं रन करावं याचा खूप कन्टेन्ट फुकटात ऑनलाईन उपलब्ध आहे, मात्र तरीही मला असं वाटतं की एखाद्या व्यक्तीची आपल्यावर छाप पडली की त्या व्यक्तीचं म्हणणं ऐकावंसं वाटतं.
कदाचित यामध्ये आयडियॉलॉजी हा देखील मुद्दा असेल... पण मला हा क्लास करावासा वाटला कारण मला काय करायचं आहे हे क्लिअर आहे आणि ते मला या ठिकाणी मिळेल असे वाटते म्हणून मी मोठी रक्कम भरून हा क्लास लावायचे ठरवले असल्याचे प्रशांत (नाव बदलले आहे.) यांनी सांगितले.
अनेक मोठे इन्फ्लूएंसर हे सध्या यु ट्यूब बिगिनर्ससाठी रोल मॉडेल बनले आहे. त्यामुळेच त्यांच्याप्रमाणेच आपणही मोठे व्हावे अशी स्वप्न यांच्यातील अनेक जण पाहतात. त्यांनी कशी सुरुवात केली, कसे शिकले, कसे इतके मोठे झाले याबाबत जाणून घेण्याची अनेकांना इच्छा असते. त्यांना भेटता आलं, त्यांच्याकडून काही शिकता यावं यासाठी अनेक जण प्रयत्न करताना दिसतात.
यामुळेच की काय सध्या काही हिंदी आणि मराठी इंफ्लून्सरने स्वतःचे वर्कशॉप, कोर्सेस तयार केले आहेत. तरुणांमध्ये हे कोर्सेस करण्याची सध्या चांगलीच क्रेज देखील पाहायला मिळत आहे. याबाबत भाडीपच्या पॉला मॅगलीन , अभिनेत्री उर्मिला निंबाळकर आणि अथर्व सुदामे या लोकप्रिय इन्फ्लूएंसरशी संवाद साधत हा प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.