पुणे : काल परवापर्यंत आम्ही दोघं मिळून आमच्या बॉसला नावे ठेवायचो, त्याच्या चुका दाखवत एकमेकांना टाळ्या द्यायचो आणि आज अचानक मला कळलं की, ज्याच्यासोबत मी बसून हे सगळं करायचो तोच आता माझा बॉस असणार आहे.
सध्या सगळ्याच ऑफिसेसमध्ये पगारवाढ आणि प्रमोशनची गरमागरम चर्चा सुरु आहे. तुला किती पगारवाढ झाली, माझ्याएवढीच झाली की जास्त झाली? जास्त झाली तर कशी काय जास्त झाली? कोणाला कोणत्या पदावर प्रमोट केलं, कोणतं प्रोजेक्ट कोणाला मिळालं अशा अनेक प्रकारच्या चर्चांनी ऑफिसमधील वातावरण काहीसं अस्वस्थ झालं आहे.
पण खरोखरच तुमच्यासोबत असं कधी झालंय का? काल परवापर्यंत तुमच्या डब्यात जेवणारे, तुमची दुःख जाणून घेणारे, ज्याला तुम्ही हक्काने शिव्या घालत असता असे तुमचेच सहकारी अचानक तुमचे बॉस होतात.
खरं तर अशा वेळी तुम्हाला आनंद होणे अपेक्षित असते की तुमचाच मित्र आता तुमचा बॉस असणारे.. पण तसं होत नाही आणि वेगळ्याच भावना तुमच्या मनात येऊ लागतात. त्याच मित्राची तुम्हाला भीती वाटू लागते..? आता हा कसा वागेल? अशी चिंता सतावू लागते.
या भावना 'जेलसी' च्या असतात का? की असुरक्षिततेच्या? या सगळ्याचा तुमच्या कामावर देखील परिणाम होऊ शकतो, अशा वेळी बॅलन्स राहण्याचा प्रयत्न कसा करावा? याविषयी जाणून घेऊया.