पुणे : ते कोविडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या दरम्यानचे दिवस होते. आमच्या बाळाला आम्ही आईकडे सोडत दोघांनी दवाखाना गाठला. माझ्या नवऱ्याच्या हाताच्या अंगठ्याला झालेल्या जखमेत थोडासा पस झाला म्हणून आम्ही ते काढायला गेलो.. भूल देऊन काढावे लागणार असल्याने त्याने ऑफिसला एका दिवसाची सुट्टी टाकलेली होती. आम्ही मेडीक्लेमसाठी चोवीस तास ऍडमिट होण्याचा निर्णय घेतला होता. संध्याकाळी १० मिनिटांचे एक छोटेसे ऑपेरेशन करून तो पस काढून टाकू असे डॉक्टरांनी सांगितले होते. त्यामुळे तो दिवसभर हॉस्पिटलमध्ये वेब सिरीज बघत बसला होता.
संध्याकाळी डॉक्टर आले. त्यांनी दहाच मिनिटात ऑपेरेशन केले. सगळे काही ओके झाले. आठवडाभराची औषधे लिहून दिली. ती मी घेऊन देखील आले. त्यात एक अँटिबायोटिक इंजेक्शन होते. जाताना सिस्टर एक इंजेक्शन देईन आणि मग तुम्ही घरी जा, असे सांगून डॉक्टर निघून गेले. दरम्यान ऑपेरेशन होऊन अर्धा पाऊण तास उलटला होता. आम्ही दोघे घरी निघायच्या तयारीत होतो.
तेवढ्यात सिस्टर आल्या आणि त्यांनी हाताला लावलेल्या सलाईनचा कॉक सुरु करून इंजेक्शन द्यायला सुरुवात केली. तेवढ्यात माझा नवरा सिस्टरला म्हणाला मला त्रास होतोय हे इंजेक्शन काढा. सिस्टरने ते काढले देखील. मग तो म्हणाला मला उलटी होतेय.. सिस्टर ट्रे आणायला गेल्या. तेवढ्यात तो बेडवर झोपला.. डोळे वेडेवाकडे करू लागला. सिस्टरने शिकाऊ डॉक्टरांना बोलावले. त्यांनी मला रूमबाहेर जायला सांगितले.. त्यांची पळापळ सुरु झाली.. हे सगळं सुरु असताना त्याच्या शरीराची हालचाल पूर्णपणे थांबली होती..
त्याचा श्वास थांबला होता.. एका छोट्याश्या अॅलर्जीने माझं संपूर्ण आयुष्य बदलणारी घटना घडली होती.. मुक्ता कुलकर्णी (नाव बदलले आहे) सांगत होत्या.