केवळ तीन सेकंदांच्या व्यायामाने व्हा तंदुरुस्त!
एका नवीन संशोधनानुसार केवळ तीन सेकंद वजन उचलण्याचा व्यायाम केला तरीही स्नायूंची ताकद वाढते, असा दावा करण्यात आला आहे.
कोरोना साथीमुळे बहुतेकांना आरोग्याचे तसेच व्यायामाचे महत्त्व पटलेयं. त्याचप्रमाणे, नवीन वर्षाचे निमित्त साधूनही अनेकजण नियमित व्यायामाचा संकल्प करतात. मात्र, ‘नव्याचे नऊ दिवस’ या न्यायाने काही दिवसांनंतर व्यायामातील नियमितपणा, उत्साह कमी होऊ लागतो. त्यानंतर, एकवेळ तर अशी येते की अनेकांचा व्यायाम बंद होतो. नोकरी, कुटुंब, व्यग्र जीवनशैलीमुळे व्यायामाला पुरेसा वेळ मिळत नसल्याचे कारण अनेकजण देतात. दररोज व्यायामाला किमान अर्धा ते एक तास द्यायला हवा, असे म्हटले जाते. त्यात काहीअंशी तथ्यही आहे. वजन उचलण्यासारख्या(वेट ट्रेनिंग) किंवा रेझिस्टन्स ट्रेनिंग व्यायामप्रकाराचा शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. त्यामुळे, शरीरातील अतिरिक्त चरबी जळण्यासह स्नायू, हाडे व सांधे मजबूत होणे, दुखापतीचा धोका टळणे व हृदय तंदुरुस्त होणे आदी फायदे मिळतात. मात्र, आता व्यायामाला एवढा वेळ नसेल तरीही काळजी करू नका.