How to prepare child to deal with difficult situations
मुंबई : मुलाचा एका शाळेत प्रवेश झाल्यावर मी ठरवलं आता मुलाच्या शाळेसाठी आपण त्याच्या शाळेजवळच घराचा पर्याय पहायचा. त्यानुसार आम्ही त्याच्या शाळेजवळच्या घरी राहायला सुरुवात केली. सुरुवातीचे दिवस नातेवाईकांची ये जा यातच गेले. मुलाला देखील ते घर आवडायला लागलं. पण एक दिवस एक खाली राहणारे काका वर आले आणि म्हणाले प्लीज तुमचा खूप आवाज येतोय, तुम्ही जरा आवाज कमी करत जा. त्यानुसार आम्ही काळजी देखील घेतली. पण दिवसेंदिवस त्यांना होणाऱ्या त्रासाचे आणि त्यांच्या अग्रेसिव्हपणे ते व्यक्त करण्याचे प्रमाण वाढतच गेले. त्यांना मुलाने घरात बॉल खेळणे सोडाच पण त्याच्या चालण्याच्या पावलाचा देखील त्यांना त्रास होऊ लागला. यामुळे घरात खेळू नकोस, पळू नकोस, घरात मोठ्याने बोलू नकोस, खाली खेळायला गेलास तर ओरडू नकोस, बॉलचा आवाज करू नकोस असे सांगू लागलो. एक दिवस तो इतका जास्त रडला आणि मला म्हणाला आई मला इथे नाही राहायचं. आपण जुन्या घरी राहायला जाऊ.. नंतर तर त्याने खेळणेच एकदमच कमी केले तो दिवसभर सोफ्यावर बसून राहू लागला.. दोन दिवस त्याने हा प्रकार केल्यावर आई म्हणून मलाही काळजी वाटली.. इतक्या लहान मुलाला समजावून सांगू कसे असा मला प्रश्न पडला..?
एक आई म्हणून मला आजही प्रश्न पडतो की, गाझा सारख्या ठिकाणी इतक्या लहान मुलांच्या कानावर जेव्हा रोज बॉम्ब आणि बंदुकीचे आवाज पडत असतील. रोज ही मुलं आपल्या आजूबाजूच्यांना किंवा नातेवाईकांना गमावत असतील अशा भयावह स्थितीत त्यांचे आई वडील त्यांना काय आणि कसे समजावत असतील? या मुलांच्या मनावर काय परिणाम होत असेल?
आज आपल्याकडे देखील कुठे भूस्खलन झालंय, कुठे लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरलंय, कुठे ढगफुटी झाली आहे. या परिस्थितीत त्या घरातील मुलं किती घाबरली असतील? त्यांच्यासाठी त्यांचे आई वडील आणि त्यांचे घर ही अत्यंत सुरक्षित जागा.. आणि अचानक हे जेव्हा नाहीसं होतं तेव्हा होणारा भावनिक गुंता त्यांच्या मनावर कायमचे व्रण ठेऊन जात असेल का?
फक्त जागेचा बदल झाला तरी मुलांच्या भावविश्वात किती मोठा बदल होतो हे मराठीत आलेल्या किल्ला चित्रपटातही दाखविण्यात आले आहे. संकटाच्या काळात जिथे पालकच संघर्ष करत असतात अशा परिस्थितीत मुलांना हा संघर्ष सांगावा का? सांगितला तर तो कसा सांगायला हवा, त्याचा मुलांच्या मनावर वाईट परिणाम होईल का? त्यांच्याशी कसं बोलावं?