जागतिक तापमानवाढ आणि उष्णतेच्या लाटा हा आता पंचतारांकित हॉटेलांतील गारठलेल्या लॉबीत चर्चा करण्याचा विषय राहिलेला नाही. तो आता तुमच्या आमच्या जीवन- मरणाचा प्रश्न झाला आहे. त्याचं गांभीर्य जितकं लवकर आपल्याला समजेल तेवढं चांगलं होईल कारण निसर्ग (Nature) आता आणखी जास्त काळ आपल्याला संधी देईल असं दिसत नाही. किंबहुना ती संधी आपण आपल्या हातानेच दवडत आहोत असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. (How to avoid heat wave)
चकचकीत नागरीकरणाच्या बेसमेंटखाली आपण आपली जंगलं (Forests) आणि जलस्रोत दफन करत चाललो आहोत. एकीकडे बाटलीबंद थंड पाण्याची (Water) चंगळ आणि दुसरीकडं हंडाभर पाण्यासाठी करावी लागणारी पायपीट हे चित्र आपल्यासाठी खचितच भूषणावह नाही. आता तर हंडाभर पाण्याचीही शाश्वती राहिलेली नाही. हे चित्र बदललं नाही तर उद्या बाटलीबंद पाण्याचंही दुर्भिक्ष्य जाणवू लागेल.