जपान हा जगातील सर्वाधिक जीवनमान असणारा देश म्हणून ओळखला जातो. जगातील इतर देशांच्या तुलनेत जपानी नागरिक दीर्घायुषी असतात.जगभरात शंभरी पूर्ण करणाऱ्यांची संख्या जपानमध्ये सर्वाधिक आहे. या देशात दर एक लाख लोकांपैकी ४८ जण १०० पेक्षा अधिक वर्षे जगतात. त्यामुळेच, जपानी नागरिकांचे सरासरी जीवनमान इतर कोणत्याही देशातील नागरिकांपेक्षा अधिक आहे. गेल्या वर्षी म्हणजे, फेब्रुवारी २०२० मध्ये तब्बल ११२ वर्षांच्या चित्तेसु वतनबे यांची जगातील सर्वांत वयोवृद्ध व्यक्ती म्हणून गिनेस बुकमध्ये नोंद झाली होती. त्यानंतर, दहाबारा दिवसांतच त्यांचा मृत्यू झाला. जपानी पुरुषांचे सरासरी वय ८० आहे तर स्त्रियांचे सरासरी वय ८६ इतके आहे. म्हणजेच, दीर्घायुषी होण्यात स्त्रियांनी बाजी मारलेली दिसते. जपानमधील नागरिक आयुष्याच्या अखेरपर्यंत शिस्तबद्ध, निरोगी जीवन जगतात. आपण भरपूर वर्षे जगावे, असे तुम्हाला वाटते का, त्यासाठी, जपानी लोकांच्या दीर्घायुष्याचे रहस्य जाणून घ्यायला हवे.