Mental health : आत्महत्येचा विचार मनात येत असेल तर काय करावं?

आत्महत्येच्या वाढत्या घटना पाहता मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यायलाच हवं, आत्महत्या टाळावी कशी, हे विचार ओळखावे कसे?
mental health
mental health E sakal
Updated on

दररोज आपण प्रसार माध्यमांत अनेक बातम्या वाचत असतो. मृत्यूच्या घटना वाचायला नको वाटतात पण तो मृत्यू स्वत:हून ओढवून घेतलेला असेल तर अधिकच नको वाटतात. आत्महत्येच्या बातम्या अस्वस्थ करतात.

नुकतंच एका नामवंत लेखकाच्या तरुण मुलाने आत्महत्या केल्याची बातमी आली. दुर्दैवाची बाब म्हणजे हे लेखक स्वत: तरुण मुलांसाठी निरनिराळी शिबीरं, कार्यशाळा घेत असत.

त्यांच्याच मुलाने अशाप्रकारे आयुष्य संपवावं यासारखी दु:खद घटना नाही. अर्थात यामध्ये त्यांना दोष देण्याचा लेखाचा हेतू अजिबातच नाही.

उलट आत्महत्या नेमक्या का होतात, आपली एखादी जवळची व्यक्ती आत्महत्येच्या विचारात आहे, हे कसं समजून घ्यावं, कळल्यानंतर नेमकं कसं वागावं या आणि अशाप्रकारच्या अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे.

यासाठी आम्ही संवाद साधला मानसोपचारतज्ज्ञ डॉ सचिन केतकर यांच्याशी.

आत्महत्या केव्हा घडतात?

- एखाद्या व्यक्तीचं मानसिक आरोग्य बिघडतं.

- काहीवेळा व्यक्ती स्किझोफ्रेनिक म्हणजे दुहेरी व्यक्तिमत्त्वाच्या जाळ्यात अडकतात.

- काहीवेळा एखाद्या जुनाट आजाराला कंटाळतात. त्यातून बाहेर पडण्यासाठी मृत्यू हेच एकमेव उत्तर असल्यासारखं त्यांना वाटतं.

- काहीजणांना समजून घेणारं कुणी उरत नाही, आयुष्य जगावं असं वाटणारी स्वयंप्रेरणाच शिल्लक राहत नाही.

- आयुष्यातील प्रश्नांची उत्तरं सापडत नाहीत आणि ती शोधण्याचा मार्गही माहिती नसतो. अशावेळी हा एकच पर्याय त्यांना समोर दिसतो.

- काही व्यक्तींना आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी स्वत:ला इजा करून घेण्याची किंवा तशी धमकी देण्याची सवय असते आणि एखाद्यावेळी घाईगडबडीत खरीच इजा होते. अर्थातच जीवावर बेतू शकतं.

- प्रसंगानुरुप आणि परिस्थितीनुरुपही आत्महत्या होतात. उदा. किल्लारी भूकंपाच्यावेळी बऱ्याच आत्महत्या झाल्या होत्या. त्यामध्ये काहींची आयुष्यभराची कमाई भुईसपाट झाली तरीही ते उभे राहिले तर काहीजण तुलनेत कमी नुकसान झालं असतानाही आत्महत्येला सामोरे गेले.

- मुळातच संकटापेक्षाही महत्त्वाचं असतं ते आपण करत असलेलं त्याचं भयानकीकरण. संकट पाहिल्यावर ते स्वीकारून त्यातून बाहेर पडण्याची जिद्द बाळगणं ही वेगळी गोष्ट असते पण, 'बापरे आपण यातून बाहेर पडूच शकत नाही', असा विचार करणं दुसरी गोष्ट असते.

- अनेकदा व्यक्ती आपण एखाद्या गोष्टीतून बाहेर पडण्याची उमेदच गमावून बसतात आणि दुर्दैवाने आत्महत्येला सामोऱ्या जातात.

आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीच्या मनात आत्महत्येचे विचार येत आहेत, हे कशाप्रकारे ओळखावं?

- बरेचदा ती व्यक्ती काही ना काही इशारे देत असते. काही दृश्य असतात तर काही अदृश्य.

- झोपेचं चक्र बदलतं.

- वागण्याबोलण्यात एकदम फरक जाणवू लागतो.

- ती व्यक्ती एकटी बसू लागते.

- अचानक मूड बदलतो म्हणजे कालपर्यंत दु:खी असलेली व्यक्ती अचानक जादुची कांडी फिरवल्यासारखी हसू लागते. तर अगदी याच्या उलटही होतं. हसतीखेळती व्यक्ती अचानक दु:खी असल्यासारखी वागू लागते.

ओळखल्यानंतर पुढची पायरी काय?

- सगळ्यात महत्त्वाचं त्या व्यक्तीशी सहसंवेदना राखून बोलणं.

- सतत काय झालं? कशामुळे झालं? असं विचारु नये.

- मानसोपचार घेण्यास लाजू नये किंवा तसा सल्ला देण्यासही कचरू नये.

- त्या व्यक्तीशी सहसंवेदना राखून म्हणजेच एम्पथी दाखवून (सिम्पथी नव्हे) बोलल्यास. त्या व्यक्तीला प्रकाशाचा किरण नक्की दिसू शकतो.

- भोचकपणा करू नये पण काळजीने केलेली चौकशी चालू शकते.

- कुणालातरी आपलं दु:ख अथवा वेदना कळत आहेत, ते आपल्यासोबत आहेत, हे कळल्यावर आत्महत्येच्या विचारात असलेली, मानसिक रोगांना त्रस्त असलेली व्यक्ती बोलती होऊ शकते.

आत्महत्याविषयक समुपदेशनं, चर्चासत्रं हवीत का?

डॉ केतकर म्हणतात, नक्कीच असायला हवीत. ते प्रथमोपचारासारखं काम करतात. म्हणजे एखाद्याच्या मनात अतिशय नकारात्मक विचार आले तर त्यावेळी एखाद्या २४ तास उपलब्ध असलेल्या हेल्पलाइनवर तो बोलला तर तो क्षण नक्कीच टळू शकतो.

आत्महत्याविषयक चर्चा केल्याने, त्याविषयी कार्यशाळा, समुपदेशन सत्र घेतल्याने आत्महत्या थांबतात का, या प्रश्नाला डॉ सचिन, 'नाही' असं उत्तर देतात.

पण ते म्हणतात, ''जगात खरंतर अशी कोणतीच गोष्ट नाही, जी आत्महत्या हा प्रकार पूर्णपणे थांबवू शकेल! पण हे थोडंसं रस्त्यावरील वाहतुकीसारखं आहे. भर रहदारीच्या रस्त्यांवर जसे अपघात होतात तसे ते रहदारी नसलेल्या सुनसान रस्त्यांवरही होतात. पण तरीही आपण वाहतुकीचे नियम का पाळतो, हेल्मेट का घालतो, परवाना असतानाच गाडी का चालवतो तर आपल्याला अपघात टाळायचे असतात. समुपदेशन, चर्चासत्र, कार्यशाळा यातून नक्कीच ते काम होतं.''

डॉ. केतकर म्हणतात, ''कधीतरी माझा एखादा रुग्ण मला सांगतो, मी तुमचा लेख वाचला होता, तुमच्या कार्यशाळेत आलो होते. त्यावेळी मला जाणीव झाली आपल्याला उपचारांची गरज आहे किंवा आपण याविषयी बोलायला हवं... माझ्यासाठी खरंतर प्रत्येक डॉक्टरसाठी हे अतिशय महत्त्वाचं असतं. रुग्ण अपेक्षित मदत वेळेवर मिळवू शकतात. एखादा जीव वाचला तरी त्याचं मोल प्रचंड असतं.''

यावर उपाय काय?

- सकारात्मक विचार हा नक्कीच उपाय आहे, पण त्याचाही अतिरेक टाळायला हवा. कारण 'विवेकशून्य विचार' हा उपयोगाचा नसतो.

- आपल्यावर एखादी परिस्थिती ओढवली आहे तर ती स्वीकारून पुढे जायला शिकलं पाहिजे. उदा. एखादा दुर्धर रोग झाला असेल तर तो रोग आपल्याला झालेलाच नाही आणि यापुढे कधीही तो उद्भवणारच नाही, त्यामुळे त्यासाठी आणखी काही मदत मिळवायची नाही, तपासण्या करायच्या नाहीत असला सकारात्मक विचार कामाचा नसतो. तर त्याला विवेकाची जोड लागते.

- आपल्याला एखादा आजार, विकार असेल तर त्याच्याशी डील करता आलं पाहिजे. त्यासाठी योग्य ते वैद्यकीय उपचार घेऊन, त्यासाठी योग्य त्या व्यावसायिकांची निवड करणे, उपचारपद्धत समजून त्यावर विश्वास ठेवणे आणि डॉक्टरांनी सांगितलेली पथ्ये पाळणे, हा तो विवेकी सकारात्मक विचार.

आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात कधी ना कधी कठीण प्रसंग येतात.

त्यावेळी नको हे सारं, संपवू असं वाटतं पण त्या गोष्टींतून मार्ग काढणं, उभं राहणं आणि पुढे जाणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. त्यात कधी कुणाची मदत लागली तर ती न लाजता घेणं हेसुद्धा महत्त्वाचं असतं. मानसिक आजारांच्या बाबतीत तर सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.