कुटुंब प्रबोधनाची आवश्यकता केव्हा निर्माण होते?
कोरोनानंतर एकत्रित कुटुंबाची आणि एकूणच कुटुंबाविषयीची आस्था वाढीला लागली आहे. परंतु एकत्र कुटुंब संकल्पना आणि त्यातून कुटुंबातील सर्व सदस्यांवर न कळत होणारे संस्कार आता कितपत शक्य आहेत, हा प्रश्न आहे. याचा अर्थ संस्कार होणारच नाहीत असे नाही. त्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न करणे आवश्यकच आहेत.
कुटुंब व्यवस्था हा स्वस्थ समाजबांधणीला आवश्यक असा घटक आहे. त्यातूनच स्वस्थ समाजनिर्मिती होत असते. आरोग्यपूर्ण, सशक्त, आत्मनिर्भर, विजिगिषु, संस्कृती समृद्ध समाज निर्माणाचा पाया म्हणजे कुटुंब. व्यक्तिनिर्माणाच्या प्रक्रियेचे मूळ स्थान म्हणजे कुटुंब. योगयुक्त, रोगमुक्त, स्वस्थचित्त कुटुंब हेच समाजाला सम्यक विकास झालेल्या व्यक्ती प्रदान करते. यामध्ये काळाच्या ओघात काही दोष निर्माण होतात. कारण कुटुंब हे माणसांनी बनते
कुटुंबात नवीन सदस्य येतात. त्यांच्यावर व कुटुंबातील इतर सर्व सदस्यांवर जगात सतत घडणाऱ्या घटनांचा स्वाभाविक परिणाम होत असतो. त्यातून अनेकदा कुटुंबात दोष निर्माण होतात. हे दोष जीवनशैलीमधील बदलत्या संकेतांमुळे आकार घेतात. किंवा यशस्वी व्यक्तिजीवनाच्या बदलत्या आदर्शांमुळे कुटुंबात नकळत प्रवेश करतात. दोष निर्माण होणे हा कुटुंब व्यवस्थेचा सहज घडणारा भाग आहे तसेच दोषांचा निचरा करून कुटुंब व्यवस्था विशुद्ध ठेवत राहणे हा सुद्धा सतत आग्रह पूर्वक करण्याचा आवश्यक भाग आहे. यासाठी ६ भ चा विचार करता येईल. ६ भ म्हणजे - भाषा, भूषा, भजन, भोजन, भवन आणि भ्रमण.
१) भाषा : कुटुंबात बोलणे मातृभाषेतून व्हावे. वेगवेगळ्या भावना व्यक्त करताना देहबोली आणि शब्द हे हिंसायुक्त नसावेत.
अगदी छोट्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांचा सन्मान राखला जाईल याचे बोलताना भान असावे. घरकाम करणारे, विविध सेवा देणारे, वॉचमन सर्वाना नात्याने हाक मारावी. पत्नीशी बोलताना स्त्री सन्मानाच्या मर्यादा सांभाळल्या जाव्यात. शब्दाच्या आधी प्रेमदृष्टीने दारात येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत व्हावे हा ज्ञानेश्वर माऊलींचा प्रेमळ सल्ला घराघरात पाळला जावा. घराघरात चढलेले आवाज मुळीच नसावेत.
२) भूषा : घरातील सगळ्यांचे कपडे भारतीय सभ्यतेला धरून असावेत. फॅशन आणि लाड यांच्या अतिरेकातून विचारांची भ्रष्टता आणि संस्कृतीची अवहेलना होणार नाही याची सदैव काळजी मोठ्यांनीच घ्यायला हवी. भारतीय सण, उत्सव परंपरा यानुसार घरात उत्साह वृद्धींगत करणाऱ्या मंगल वेशभूषा असाव्यात.
३) भजन : घरात रोज एकदा एकत्र घराण्याच्या परंपरेप्रमाणे प्रार्थना व्हावी. देशाची, शेतकऱ्यांची, सैनिकांसाठी, किंवा निसर्गाची प्रार्थनाही चालेल.
४) भोजन : रोज एकवेळ तरी घरातील सर्वानी एकत्र जेवण करावे. घरातील खाद्यपदार्थ आपल्या संस्कृतीतील असावेत. ऋतू,वातावरण, काळ पाहून आपल्या परिसरातील उपलब्ध धान्य, भाज्या, फळे खावी. विरुद्ध अन्न टाळावे. जेवताना टीव्ही, मोबाईल बंद असावेत. हसत खेळत, आनंदी मनःस्थितीत जेवावे. जेवणापूर्वी सर्वानी भोजनमंत्र म्हणावा. शक्यतो मांडी घालून बसून जेवावे.
५) भवन : आपले घर हे आपले ऊर्जा केंद्र आहे. संताप, आदळआपट, भांडणे, जोरजोरात वादावादी, दुसऱ्यांची उणीदुणी काढणे यामुळे नकारात्मक स्पंदने वाढतात. बंद पडलेल्या, उपयोगात नसलेल्या वस्तू, धूळ, अंधार यामुळेही घरात नकारात्मक स्पंदने वाढतात. म्हणून घर सतत स्वच्छ, आवश्यकता वस्तूंचे तसेच अडगळ नसलेले ठेवावे. घरात सूर्यप्रकाश असेल याची काळजी घ्यावी. समईची ज्योत, घंटानाद, भजन, आरती यामधून घरात सकारात्मक ऊर्जा तयार होत असते. आपले घर हे दुसऱ्यांच्या मनःशांतीचे ठिकाण असावे. आपल्या घराचे आपल्याला मंदिर बनवता येईल का? हा विचार सतत मनात असावा. आपल्या कुटुंबाची धारणा एकच असावी. घरात पैसा, ऐश्वर्य यांचे प्रदर्शन असू नये. संपन्नता असली तरी नम्रता असावी. वस्तूंची लालसा नसावी. शक्यतो कुटुंब एकत्र असावे. व्यावहारिक बंधनांमुळे एकत्र राहणे शक्य नसले तरी मनांची ताटातूट नसावी.
६) भ्रमण : घरातील सर्वजणांनी एकत्र कुलदेवता दर्शनासाठी प्रवास करावा. अधूनमधून नातेवाइकांकडे सहज मुक्कामाला जात रहावे. मुलांच्या मित्रांच्या घरी जात रहावे. स्नेह वाढवावा. मुलांना समाजाचे दर्शन व्हावे यासाठी अनाथाश्रम, सेवावस्तीत भ्रमण असावे.
कौटुंबिक समस्या आणि निराकरण
समस्या हा मानवी जीवनातील अविभाज्य घटक आहे. कुटुंबात समस्यांचे आकलन, समस्या स्वीकारणे आणि समस्यांची उकल याची सामुहिक-संतुलित आणि दीर्घकालीन प्रक्रिया असली पाहिजे. घरात एकमेकात संवाद जेवढा जास्त तेवढे समस्या निराकरण सुव्यवस्थितपणे होत जाते. अनेकदा ताबडतोब प्रतिक्रिया व्यक्त होतात व समस्यांचा गुंता अधिक वाढतो.
प्रत्येक कुटुंबातील सहज संवाद वाढावा तसेच आसपासच्या कुटुंबातील संबंध अधिक दृढ व्हावेत यासाठी कुटुंबातील सदस्य आठवड्यातून एकदा एक तासभर एकत्र बसावे. हलकेफुलके आणि छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा सहभाग असणारे कार्यक्रम करावेत. एकूणच कुटुंबातील सर्वजण एकमेकांना घट्ट जोडले जावेत तसेच आसपासच्या कुटुंबातील सर्वजण एकमेकांना जोडलेले असावेत यासाठी प्रयत्न व्हावेत
संस्कृती जतनाचा प्रयत्न
भारतीय कुटुंबात राष्ट्राचा इतिहास, संस्कृती, परंपरा, मातृभाषा, पारंपारिक वेशभूषा, कुळधर्म-कुळाचार याबद्दल अनास्था निर्माण झाली. इंग्रजी माध्यमातून मुलांना शिकविण्याच्या अट्टहासातून राष्ट्रीय महापुरुष आणि सांस्कृतिक वारसा याबद्दलच्या अज्ञानामध्ये नवी पिढी मोठी झाली. म्हणूनच ऐतिहासिक वारसा आणि परंपरा यांचा अभिमान निर्माण करण्यासाठी कुटुंब प्रमुखाने प्रयत्न केले पाहिजेत.
जीवनशैलीचा परिणाम
पाश्चात्त्य शिक्षणपद्धती, अर्थार्जनाची चढा-ओढ, संपन्न व यशस्वी जीवनाच्या पाश्चात्त्य संकल्पनांचा प्रभाव, विज्ञान व तंत्रज्ञानाने घरा-घरात केलेला शिरकाव या सर्व बाबींमुळे घरा-घरात नवीन जीवनशैली निर्माण झाली. परंतु, संपन्नता, आर्थिक सुबत्ता, स्वयंचलित वस्तूंची रेलचेल, उच्चशिक्षणाचा ध्यास घेऊन प्रयत्नपूर्वक साध्य केलेली पिढी या सर्व गदारोळात मनाची ताकद, कमीत-कमी पैसा व साधनांमध्ये समाधानाने जीवन जगण्याची कला, कृतज्ञता, संस्कार, रोजच्या दिनक्रमाची शिस्त, आहार-विहार याबाबतची जागरूकता अशा सर्व गोष्टींचे महत्त्व कमी झाले. परिणामी मानसिक अनारोग्य, ताण-तणाव, नाते-संबंधातील दुरावा अशा अनेक समस्या निर्माण झाल्या. योग, दिनचर्या, आयुर्वेद, अर्थभान, विज्ञान, निसर्ग सहवास इत्यादींचे व्यक्तिगत आणि कौटुंबिक संकल्प करण्यासाठी कुटुंबांना उद्युक्त केले पाहिजे.
समुपदेशनाची आवश्यकता
समाजातील कोणाही व्यक्तीची मनःस्थिती कोणत्याही कारणाने विचलित झाल्यास त्या व्यक्तीची ऊर्जा कमी होत जाते.अशा वेळी ती व्यक्ती स्वतः सक्षम असल्यास काही काळाने सावरते. पुन्हा नव्या ऊर्जेने जीवन जगू लागते. मात्र काही व्यक्ती स्वतः सावरू शकत नाहीत. कोणीतरी त्यांच्याशी संवाद करावा लागतो मग त्या सावरू लागतात. हा संवाद म्हणजेच समुपदेशन. समुपदेशनाने व्यक्तीची विचार करण्याची क्षमता पुन्हा परत येते. मनाची दुर्बलता कमी होते. समुपदेशन व्यक्तीचे नातेवाईक, मित्र, आध्यात्मिक गुरू किंवा व्यावसायिक समुपदेशक यापैकी कोणाकडूनही मिळू शकते. समुपदेशन करणाऱ्यांचे कौशल्य महत्त्वाचे असते.
समुपदेशनाची गरज केव्हा निर्माण होते?
अचानक दुःखाचे प्रसंग आल्यास
काल्पनिक भीती
अपेक्षित यश न मिळाल्यास
व्यक्तिगत संबंधात ताण निर्माण झाल्यास
आर्थिक समस्या न सुटल्यास ताण येतो
वैवाहिक संबंधात वाद, अपेक्षाभंग इ.
निर्णय घेण्यात गोंधळ निर्माण झाल्यास
व्यक्तिमत्त्वातील दोषांमुळे जीवनात समस्या निर्माण झाल्यास
या व अशा अनेक प्रसंगात व्यक्तीची भावनिक व्यवस्थापनाची क्षमता कमी होते. राग, भीती, मोह, चिंता, निराशा अशा भावनांचा उद्रेक होतो. समस्येतून मार्ग काढण्याऐवजी समस्येची काल्पनिक तीव्रता वाढत जाते. एखाद्या व्यक्तीला जीवन संपवावेसे वाटते. अशावेळी समुपदेशन त्या व्यक्तीला आधार देते.
भारतीय मानसशास्त्राचा आधार
महाभारतकाळात झालेले कौरव-पांडवांचे युद्ध आणि त्यावेळी अर्जुनाला आलेले मनोदौर्बल्यावेळी कृष्णाने अर्जुनाशी केलेला संवाद हे समुपदेशनाचे सार्थ उदाहरण आहे. त्यामुळेच भगवतगीता हे मानसशास्त्रीय संकल्पनांचे शास्त्रच आहे. मनाचे सर्व व्यापार त्यातून निर्माण होणाऱ्या नकारात्मक भावना व त्यांचे होणारे परिणाम याची शास्त्रशुद्ध चर्चा गीतेमध्ये मिळते.
बुद्धी-मन-शरीर यांच्या योग्य प्रक्रियांद्वारे जीवनऊर्जा पुन्हा कशी मिळू शकते याचे शास्त्रशुद्ध मार्गदर्शन गीतेमध्ये मिळते. म्हणूनच ज्ञानेश्वरी हाही मानसशास्त्रचाच ग्रंथ आहे. वरील सर्व गोष्टींचा उपयोग करून व्यक्तीचे मानसिक आरोग्य आणि त्याद्वारे समाजाचे मानसिक आरोग्य नित्य सुस्थितीत ठेवण्यात हातभार लावला जातो
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.