वर्क फ्रॉम होमला पसंती मिळतेय कारण...
घरून काम करणे अधिक सोयीचे आहे. प्रवासाचा वेळ वाचतो. इंधनासाठी होणार खर्च करावा लागत नाही. मुळ गावी जावून काम करता येते. कुटुंबाला वेळ देता येतो, अशा एक ना अनेक कारणांमुळे घरून काम करण्यास (वर्क फॉर्म होम) अनेकांची आजही पसंती आहे. मात्र प्रत्येकासाठीच घरून काम करणे शक्य होत नाही. घरून काम करण्यासाठी घर छोटे आहे. पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत. घरून काम करण्यासाठी पूरक ठरेल असे वातावरण नाही किंवा घरून काम करने कंटाळवाणे आहे, असे देखील अनेकांचे म्हणणे आहे. काही नोकऱ्या अशा आहेत की, तेथील कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष कामावर हजर होण्याशिवाय पर्यायच नसतो. त्यामुळे कामाचा कोणती पद्धत तुम्हाला आवडेल याबाबत नुकत्याच घेण्यात आलेल्या एका सर्व्हेत ५१ टक्के नोकरदारांनी आम्हाला यापुढील काळात हायब्रीड पद्धतीने काम करायला आवडेल, असे सांगितले आहे. कोरोनामुळे कार्यालयीन काम आणि कामाच्या पद्धतीत मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. हे बदल कर्मचाऱ्यांच्या मतावर घेण्यात आलेल्या या सर्व्हेतून स्पष्ट होतात.
गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी असलेल्या गोदरेज अँड बॉयसने घर आणि संस्थात्मक विभागांमध्ये भारतातील अग्रगण्य फर्निचर सोल्यूशन ब्रँड असलेली व्यवसाय शाखा गोदरेज इंटेरिओने हा सर्व्हे घेतला आहे. ‘घर, कार्यालय आणि त्यापलीकडे’ या विषयावर हा सर्वे घेण्यात आला आहे. या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, कार्यालयात जाऊन काम करायला आणि घरून काम करायला अशा मिश्र कार्यपद्धतीला (हायब्रीड) पसंती दिल्याचे त्यातून दिसून आले. सर्व्हेक्षणात वय, कामाचा अनुभव आणि स्त्री-पुरुष यानुसार भिन्न प्राधान्ये असलेली भिन्न कर्मचारी व्यक्तिमत्त्वे आढळून आली आहेत. स्त्री-पुरुषांना आपापल्या कामाच्या ठिकाणापासून वेगवेगळ्या प्रकारच्या पाठबळाची आवश्यकता असते. त्यांची नियुक्ती व कंपन्यांकडून त्या कशा वेगवेगळ्या अपेक्षा ठेवत आहेत, हे या सर्व्हेक्षणातून ठळकपणे अधोरेखित करण्यात आले आहे.