कोरोनानंतर भारतात आरोग्य विम्याची मागणी वाढली...
कोरोना या साथीच्या आजाराने संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतले. याचा परिणाम मानसिक, शारीरिक आरोग्याबरोबर आर्थिक स्थितीवर ही प्रामुख्याने जाणवला. घरातील सदस्यांना कोरोनाची लागण त्यात, उपचाराचा खर्च देखील परवडणारा नव्हता. तसेच विमा नसलेल्यांना तर याचा मोठा फटका बसला. अशा परिस्थितीमध्ये नागरिकांनी आपल्या कुटुंबीयांच्या भविष्यासाठी देशात कोरोनानंतर आरोग्य विम्याच्या मागणीत तीन पटींनी वाढ झाली आहे. एका खासगी कंपनीने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब स्पष्ट झाली असून त्यामध्ये आरोग्य विम्यासाठी स्टार हेल्थ, मॅक्स ब्युपा, एचडीएफसी अर्गो सारख्या कंपन्यांना सर्वाधिक प्राधान्य दिले जात असल्याचे दिसून आले.
कोरोनानंतर भारतातील आरोग्य विम्याच्या मागणीत कशी व किती वाढ झाली आहे, याचा विश्लेषणात्मक अभ्यास करण्यासाठी ‘जस्ट डायल कन्झ्युमर इनसाइट्स’द्वारे इंटरनेटवर तसेच जस्ट डायल प्लॅटफॉर्मचा वापर करत केले जाणारे विमा कंपनींचे ‘सर्च ऑप्शन’च्या डेटाचे सर्वेक्षण केले. तसेच विविध विमा कंपनीमध्ये काढण्यात येणाऱ्या विम्याचा संपूर्ण डेटा गोळा करण्यात आला. त्या डेटाच्या आधारावर एक अहवाल तयार करण्यात आला असून त्यामध्ये देशातील विविध श्रेणीतील शहरांचा समावेश आहे. तसेच महिना, तिमाही आणि वर्ष, अशा तीन टप्प्यात विम्याच्या मागणीत झालेली वाढ याची माहिती सादर करण्यात आली आहे.