राज्यातील सत्ताबदलानंतर महापालिका निवडणुकांमधील चित्र बदलणार...
राज्यात नव्याने झालेल्या सत्तांतराचा परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर होणार हे निश्चित. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या युतीमुळे महापालिका निवडणुकीची गणिते बदलली असून, आता या नव्या युतीनुसार निवडणुकीची गणिते जुळवण्यास सुरवात झाली आहे. भारतीय जनता पक्षाला अपेक्षित असणारी फूट शिवसेनेत पडल्याने आणि शिवसेनेसह महाविकास आघाडी राज्यात सत्तेबाहेर गेल्याने त्याचे पडसाद आता महापालिका निवडणुकीच्या राजकारणावर उमटू लागले आहेत. संपूर्ण राज्याचे लक्ष असणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत या सत्तांतरामुळे मोठी उलथापालथ अपेक्षित असून, मुंबई सोबतच ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, नाशिक महापालिका निवडणुकांचे चित्र बदलणार आहे. महापालिकेसोबत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीतही ही नवी युती काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस समोर मोठे आव्हान निर्माण करेल असे वातावरण तयार होत आहे.