दूरचित्रवाणी नवा नवा होता तेव्हा किती ते त्याचं अप्रुप. ज्यांच्या घरी होता त्यांचा मोठा रूबाब. नंतर हळूहळू तो घराघरात पोहोचला आणि लोकांच्या मानगुटीवरच बसला. असंख्य घरात सकाळी उठल्यापासून उत्तररात्रीपर्यंत तो कोकाटत असतो. वास्तविक प्रबोधनाबरोबरच मनोरंजन आणि विरंगुळा असं हे माध्यम. मात्र, अलिकडच्या काही काळात ते इतकं भरकटलं आहे की, मालिकांचा रतिब घालणाऱ्यांची डोकी एकदा सामुहिक तपासायला हवीत, अशा प्रतिक्रिया लोकांमधून उमटू लागल्या आहेत.
''मालिकांचे विषय, संवादलेखन, अभिनय, प्रकाशयोजना, कपडेपट, रंगभूषा...आणि दिग्दर्शन या काही प्राथमिक टप्प्यावरील बौध्दिक दिवाळखोरीचा जरी विचार केला, तरी यामधील प्रत्येकाला चिरडून मारलं पाहिजे, अशी भावना होते ओ...''असे एक गृहस्थ कळवळून मला सांगत होते. काहीतरी कामाचे निमित्त काढून ते मला भेटायला कार्यालयात आले होते आणि दूरचित्रवाणी व त्यावरील मालिका याच विषयावर बोलत राहिले. "घरात सगळेजण आपापल्या कामात, मोबाईलमध्ये व्यस्त आणि मी एकटाच रिकामा. कारण मी निवृत्त! मग बसतो दूरचित्रवाणी लावून. सुरूवातीच्या काळात म्हणजे नवा नवा आला तेव्हा तो बरा होता. मर्यादित वेळ, सहकुटुंब सहपरिवार पाहण्यायोग्य कार्यक्रम असायचे, पण आता? प्रेक्षकांच्या सहनशक्तीचा अंतच बघतात हो कार्यक्रम निर्माते!" या गृहस्थांचा मालिकांवरील अभ्यास चांगलाच झालेला होता. कोणती मालिका कोणत्या वेळी लागते, पात्रांची नावे सगळे सगळे तोंडपाठ! प्रत्येक मालिकेविषयी सांगताना त्यांचा चेहरा अधिकाधिक त्रासिक होत होता. घरात बसून होणारी घुसमट लक्षात येत होती. ( How TV shows try to keep the audience hooked)
यावर काहीतरी लिहायला हवं वाटलं, म्हणून मग विविध वयोगटातील लोकांशी गेले काही महिने बोलत राहिलो. आणि लक्षात आले की, ''जो त्रास ज्या सेवानिवृत्त वृध्द नागरिकाला होतोय तशीच स्थिती सर्वांची आहे. साऱ्यांचं एकच म्हणणं-आमच्या डोक्यावर का लादतात असले कार्यक्रम. आम्हा प्रेक्षकांना काय हवं काय नको त्याचा कधीतरी विचार का करत नाहीत. मलाही ते पटले.''