अलीकडच्या काही वर्षात स्पर्धा परिक्षा देणाऱ्यांचं पेव इतकं फुटलं आहे, की बाहेरगावाहून आलेल्या कोणत्याही ५० मुलांना विचारलं की ४५ जण सांगतात एमपीएससी करतोय.
कोणत्याही गावात गेलं आणि विचारलं की पोरगा काय करतोय? तर हमखास उत्तर मिळतं एमपीएससी. कुठे शिकतोय? पुण्यात. किती वर्षे झाली? पाच वर्षे. गावाकडे कधी आलेला? चार वर्षापूर्वी. पुण्यात नोकरी करतोय? नाही. मग तुम्हीच महिन्याला पैसॆ पाठवताय? हो. किती? कधी दहा, कधी पंधरा हजार. इतकं विचारलं की आईबापाला लगेच पोराच्या कौतुकाचा उमाळा येतो आणि सांगू लागतात- लै कष्टाळू हाय पोरगं. लै अभ्यास करतयं. गेल्या तीन टायमाला एका मार्कात गेलं, नाहीतर पीएसआय झालं असतं.
अलीकडच्या काही वर्षात स्पर्धा परिक्षा देणाऱ्यांचं पेव इतकं फुटलं आहे, की बाहेरगावाहून आलेल्या कोणत्याही ५० मुलांना विचारलं की ४५ जण सांगतात एमपीएससी करतोय. पदवीधर मुलांवर मार्केटिंगने असे काही गारूड केले आहे की प्रत्येकाला वाटते डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी बनायचे. अभ्यासासाठी चांगले वातावरण कुठे तर पुणे. मग चलो पुणे. मी यशस्वी कसा झालो, अशा पोस्ट सोशल मिडीयावर भारंभार पडत असतात. अरे मग तो झाला आणि मी का होणार नाही? असा विचार करून ही पोरं पुण्यात येतात. गावची शेतीवाडी, घरचं दुधदुभतं सोडून कॉट बेसिसवर राहतात, न आवडणारी भाजी व डाळ नसलेली आमटी खाणावळीत खातात. क्लासला नाव घालतात. त्याचवेळच्या एकदोन महिन्यात गुणवंत मुलांच्या सत्काराचा कार्यक्रम होतो. मनोगत व्यक्त करणाऱ्या ती यशस्वी मुलं लंबीचौडी भाषणं करतात- माझी परिस्थिती इतकी बिकट होती की घरात खायला नव्हतं, आईवडिलांचे कष्ट बघवत नव्हते, 24 तास अभ्यास केला. अपयश आलं. आत्महत्या करायचे विचार डोक्यात येत होते. असं काहीही सांगत असतात. यू ट्युबवर याविषयी शोधलं तर असले ढीगभर व्हिडिओ दिसतील. आपण यशस्वी झालो म्हणजे आपण कोणीतरी विशेष आहोत आणि आपले हात आभाळाला टेकलेत अशा अविर्भावात बढाई करणारी भाषणे ठोकत असतात. अशी भाषणे ठोकून गेल्या तीन-चार पिढ्या बाद करणारे सुद्धा काही आयपीएस अधिकारी महाराष्ट्रात आहेत. मात्र, अशा एकूणच प्रभावाने ही २१-२२ वर्षाची कोवळी पोरं अशी स्वप्ने घेऊन पुण्याकडे धाव घेतात.