तुफान, बादल, वादळ! इंजिने धावणार कधी?
शंभू, लखन, तुफान, मन्या, इंजिन, बादल, सरदार, वादळ, टायगर, लक्षा, नसऱ्या...ही नावं आहेत धावणाऱ्या इंजिनांची. एकेकाची मूळ किंमत पंधरा ते वीस लाख. मात्र, अलिकडच्या काळात ती घसरली की, शेतकऱ्यांना घरातील अडगळ वाटू लागली आहे. इंजिनांचा वापर होत नसल्याने ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. आता फार कमी जणांकडे ती आहेत. काहींनी घराण्यांची परंपरा म्हणून, काहींनी हौस म्हणून, काहींनी लळा म्हणून ती ठेवली आहेत. खिलार इंजिने पुन्हा धावतील अशी आस साऱ्यांना आहे.
आपल्या कृषी संस्कृतीमध्ये बैल हा ग्रामीण जीवनातील अविभाज्य घटक आहे. शेतकरी पशूधनाचे पोटच्या मुलांप्रमाणे संगोपन करतो. पेरण्या संपल्यानंतर गावयात्रा आणि त्याच्या जोडीला बैलगाडा शर्यत ही प्रथा, परंपरा आहे. ती शेकडो वर्षांपासून आजही महाराष्ट्रातील गावागावांमध्ये पाळली जाते.
बैलगाडा शर्यतीचे विविध सात प्रकार आहेत. पुणे व नगर जिल्ह्यात चार बैलांची शर्यत केली जाते. त्यामध्ये गाड्यावर माणूस नसतो. दिशादर्शक घोडेस्वार बसलेल्या घोडीमागे बैलजोड्या धावतात. १५० मीटर अंतर असते आणि ते कापण्यासाठी अवघी ४ ते ५ मिनीटे लागतात. पश्चिम महाराष्ट्र व विदर्भातील जिल्ह्यात शंकरपाट, छकडी किंवा छकडा शर्यत होते. यामध्ये ४ ते ५ ट्रॅकवर सर्व बैलजोड्या छकड्यासह धावतात. त्याची लांबी ३५ ते ४० मीटर व रुंदी ४०० ते ४५० मीटर असते. त्यामध्ये छकड्यावर बैलांना हाकणारे दोघे जण असतात. बैलांना काठी किंवा चाबूकच्या सहाय्याने हाकले जाते. तिसरा प्रकार म्हणजे लांब पल्ल्याची आरत पारत शर्यत. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर येथे ती भरवली जाते. यामध्ये गाडीवानासह २ बैलांची गाडी शर्यत सुरू होते त्या ठिकाणापासून धावून पुन्हा शर्यतीच्या आरंभस्थळाकडे परतात. चौथा प्रकार लाकूड ओंडका शर्यत. ती सांगली, कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रात होते. यामध्ये बैलजोडीला लाकूड ओंडका लावून पळविले जाते. नगर, नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात घोडा बैल (शेंबे गोंडा शर्यत) शर्यत असते. यामध्ये गाडीवानासह घोडा आणि बैल जोडून गाडा शेतातून १००० मीटरपर्यंत पळविला जातो. चिखलगुत्ता हा प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातली गडहिंग्लज तालुका आणि कोकणात होते. नांगरणी स्पर्धेमध्ये ही शर्यत खेळवली जाते. आठवा प्रकार म्हणजे समुद्र किनारा शर्यत होय. ती कोकणाच्या रायगड, रत्नागिरी, सिंधूदूर्गात समुद्रकिनारी खेळविली जाते.