सिंधुदुर्ग किल्ला, तारकर्ली बीच, भोगवे बीच, देवबाग बीच, रेडी, वेंगुर्ले बंदर, आंबोलीचे वन पर्यटन, सागरी जलक्रीडा प्रकार अशा सागरी पर्यटनामुळे सिंधुदुर्ग जिल्हा जगाच्या नकाशावर पोचला आहे. सिंधुदुर्ग म्हणजे फक्त सिंधुदुर्ग किल्ला, समुद्र, बीचेस आणि मासे असा अनेकांचा समज असतो, पण एवढंच नसून एक सुंदर खाद्य-भटकंतीसुद्धा आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा फिरायचा म्हणजे सामान्य पर्यटकासाठी कोकण रेल्वे हा सर्वात सोईस्कर पर्याय आहे. कोकण रेल्वेने कुडाळ, सावंतवाडी, वैभववाडी स्थानकात उतरून रिक्षा, एसटीने काही तासांत विविध पर्यटन स्थळांना पोचता येते. कोकण रेल्वेच्या ‘मांडवी’ आणि ‘कोकणकन्या’या दोन गाड्या त्यातल्या केटिरंग सर्व्हिससाठी प्रसिद्ध आहेत. भारतातल्या काही मोजक्याच गाड्यांमध्ये असे विविध आणि दर्जेदार पदार्थ मिळतात.