पुणे - मी पहिल्या दिवसापासून ऑफिसमध्ये कामाशी काम ठेवलंय. आपलं आपलं काम करते आणि घरी जाते... पण तरी ऑफिसमधली काही लोकं जेव्हा माझ्याबद्दल बोलतायत (back-stabbing) असं मला जाणवतं, मला वेगळं पाडलं जातंय असं जाणवतं तेव्हा मला खूप त्रास होतो..
या सगळ्यावर मी थेट भांडायचा प्रयत्न केला पण त्यात पुन्हा मीच वाईट ठरले. मुंबईच्या सरकारी कार्यालयात कंत्राटी पदावर काम करणारी मीनल गायकवाड (नाव बदलले आहे) सांगतेय.
यामुळे ऑफिसच्या पार्ट्या, बर्थडे सगळंच टाळते आहे..
मीनल पुढे म्हणते, मी कितीही ठरवलं तरीही याचा विचार बंद करू शकत नाहीये. माझ्या ऑफिसमधल्या एका मुलीने सगळयांना सांगितलंय की ही किती मूर्ख मुलगी आहे. ती सतत माझी मापं काढते. मला एखादी गोष्ट माहिती नसेल तर त्याची खूप मोठ्यामोठ्याने सर्वांमध्ये चर्चा करते.
माझ्या राहणीमानावर कमेंट करते. टोमणे मारते. ती कोणतीच कृती थेट करत नसल्याने मला तिच्याविरोधात तक्रार करता येत नाही. यामुळे मी सर्वांशीच बोलणं कमी केलं आहे. मला असं वाटतंय की हळूहळू सगळेच माझ्याबद्दल तसाच विचार करतायेत.
मी आता अजिबातच कोणामध्ये मिक्स होत नाही. ऑफिसच्या पार्ट्या, बर्थडे सगळं टाळते. मला यामुळे आता कामावरच जावेसे वाटत नाही..
सगळ्याच क्षेत्रात ग्रुपीजम
रोजचे झोपेचे तास सोडले तर घरापेक्षाही अधिक वेळ आपल्यातील अनेकजण हे ऑफिसमध्ये घालवतात. साधारण आठ तास ते दहा तास ऑफिसमधल्या सहकाऱ्यांसोबत घालवावे लागतात. अश्यातच जर ऑफिसेसमधील वातावरण जर त्रासदायक ठरणारे असेल तर त्याचा कामावर आणि व्यक्तिगत आयुष्यावर देखील होताना पाहायला मिळतो.
ऑफिसमध्ये होणारे ग्रुपीजम (Office groupism) हे कधी कामाच्या बाबतीत होते, कधी ते भाषेवरून होते, कधी ते संभाषणातील कमतरतेमुळे, कधी वैयक्तिक कारणावरून होताना दिसते. आणि याला कोणतेच क्षेत्र अपवाद ठरत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणातही सध्या गटातटाचे राजकारण मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत.
कॉर्पोरेट ऑफिसेस मध्ये ग्रुपीजम होऊ नये पॉलिसीज
ऑफिसमध्ये ग्रुपीजम होऊ नये यासाठी अनेक कॉर्पोरेट क्षेत्रात (corporate sector) विशेष काळजी घेण्यात येते. यासाठी त्यांच्या एचआर पॉलिसीजमध्ये (HR Policies) जाणीवपूर्वक काही बाबींचा समावेश असतो.
ज्यामध्ये ठरवून विविधता आणणे, वयानुसार गट करणे, बसण्याची जागा विशिष्ट विचाराने ठरविणे, संस्कृतिक कार्यक्रम साजरे करणे, एकत्रित बाहेरगावी जाणे, खेळ खेळणे, टीमवर्क आणि टीम बिल्डिंगला प्राधान्य देणे अश्या प्रकारच्या गोष्टींचा समावेश असतो.
कसं 'डील' करू या सगळ्याशी?
काहीच दिवसांपूर्वी मला एक मेसेज आला त्यात ती व्यक्ती मला सांगत होती की, " मला ऑफिसमध्ये चाललेल्या गोष्टींचा खूप त्रास होतोय. ऑफिसमधल्या अनेकांकडून मला टार्गेट केलं जातंय असं मला वाटतंय तुम्ही प्लीज याविषयी मला काहीतरी सांगा."
किंवा अशाही केसेस येतात की, जेव्हा ऑफिसमधल्या नवराबायकोचे ग्रुप असतात त्यात कोणाचेतरी खूपवेळ एकमेकांशी बोलत राहणे एखाद्या बायकोला किंवा नवऱ्याला खटकत असते. काही वेळेला किट्टी पार्टीमध्ये (kitty Party) कोणालातरी मैत्रिणींच्या ग्रुपकडून सातत्याने अपमानास्पद वागणूक मिळत असते. अशा कितीतरी प्रकारच्या समस्या घेऊन लोक आमच्याकडे येतात.
नाही बोललत तर जगणं थांबणार आहे का?
मुळात आपल्याला अशा गोष्टी झाल्यावर खूप त्रास का होतो हे समजावून घ्यायला हवे. पूर्वापार माणूस हा टोळीमध्ये राहिलेला आहे आणि टोळीमध्ये राहणे हा त्याच्या जगण्याचा एक भाग झालेला आहे. त्याला जर टोळीमधून बाजूला केले गेले तर त्याला ते पचवायला खूप अवघड जातं. त्याचा त्रास होतो.
पण आधी हे समजून घ्यायला हवं की पूर्वी टोळीमध्ये राहणे हे सुरक्षेच्या दृष्टीने गरजेचे होते. शत्रूपासून धोका निर्माण झाल्यास बचाव करता यावा म्हणून एकमेकांची गरज भासत होती. पण आता तशी परिस्थिती नाहीये. आता टोळीमध्ये राहणे हा तुमच्या जगण्यावर किंवा जिवंत राहण्याचा प्रश्न नाहीये हे आधी तुमच्या मनाला समजावून सांगायला हवं, म्हणजे त्रास कमी होईल.
सकारात्मक अलिप्तता (positive detachment) स्वीकारणे अधिक योग्य..
अनेकदा ऑफिस ग्रुपीजम संबंधी घडणाऱ्या घटना या अनेकांच्या लेखी तितक्याशा गंभीर किंवा वाईट नसतीलही पण आपणच घ्या आपल्या डोक्यात जास्त मोठ्या करत असतो कारण आपला इगो हर्ट (Ego hurt) झालेला असतो.
इगो (Ego) हर्ट झाला हे पण आपणच ठरवलेलं असतं. अशा परिस्थितीत आपल्याला संबंधित व्यक्तींना जाब विचारण्याची इच्छा होते. पण त्यावेळी फारसे संयुक्तिक नसते. काही काळासाठी सकारात्मक अलिप्तता स्वीकारणे अधिक फायद्याचे ठरते.
मेंदूला सारासार विचार करण्याची सवय लावा
कुठल्याही गोष्टीसोबत वाहवत जाण्यापेक्षा त्या गोष्टीतून सकारात्मकरित्या अलिप्त होऊन त्याचा सारासार विचार केल्यास अनेक प्रश्नांची उकल होऊ शकते. आपण आपल्या मेंदूला अशा गोष्टींशी कसं डील करायचं यासाठी ट्रेन करायला हवं. स्वतःच्या मेंदूला सारासार विचार करायची सवय लावायला हवी. त्यातून भविष्यातही अशा गोष्टी झाल्यास त्याने त्रास होणार नाही.
-------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.