जागतिक वारसास्थळांच्या यादीत आता भारत ‘सुपर-४० क्लब’मध्ये सामील झाला आहे. तर लवकरच आणखी सहा वारसास्थळांना दर्जा मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर भारताचे लक्ष्य हे अव्वल क्रमांक गाठण्याचे असेल.
देशातील ढोलावीरा आणि रुद्रेश्वर मंदिरांचा जागतिक वारसास्थळांच्या यादीत समावेश केला आहे. त्यानंतर भारताची जागतिक वारसास्थळे ४० झाली आहेत. नुकत्याच चीनमध्ये झालेल्या युनेस्कोच्यावतीने जागतिक वारसास्थळ समितीच्या ४४ व्या परिषदेत भारतातील हडाप्पा संस्कृतीचे प्राचीन शहर ‘ढोलावीरा’ आणि तेलंगणातील सुप्रसिद्ध रुद्रेश्वर (रामाप्पा) मंदिर या दोन स्थळांना जागतिक वारसास्थळांचा दर्जा मिळाला. त्यामुळे भारताने आपल्या मुकुटात दोन शिरपेच खोवताना आता ‘सुपर-४० क्लब’ गाठला आहे. पण जगातील अनेक छोटे देशांतील स्थळांची संख्या ही आपल्यापेक्षा खूपच अधिक असल्याचे दिसून येत आहे. पहिल्या क्रमांकाच्या इटलीमध्ये तब्बल ५८ जागतिक वारसास्थळ आहेत, त्यावरुन आपल्याला अजून किती मोठा पल्ला गाठायचा आहे, हे दिसून येईल. कारण आपल्या खंडप्राय देशात आणखी ४०-५० वारसास्थळे नक्कीच आहेत.