सोलापूर : बदलत्या जीवनशैलीत गोडव्यासोबत पोषणमुल्य असलेल्या गुळाच्या वाढता वापर पाहता अनेक काळापासून दुर्लक्षीत राहीलेला गुळ निर्मितीच्या क्षेत्राला शासनाच्या सकारात्मक धोरणासोबत गुणवत्ता प्रमाणीकरण ते ब्रँडिंगची आव्हाने उद्योजक, गूळ उत्पादकांना खुणावत आहेत.
मागील काही वर्षात जिवनशैलीत सेंद्रिय पदार्थांचा उपयोग वाढला आहे. रसायनमुक्त व नैसर्गिक पध्दतीने तयार होत असलेली पिके व उत्पादनांची समांतर बाजारपेठ उभी राहत आहे. त्यामध्ये साखरेला उत्तम नैसर्गिक पध्दतीचा व पोषणमुल्ये असलेला पर्याय म्हणून गुळाचे महत्व अधोरेखित केले जात आहे.मिठाई बाजारामध्ये गुळाच्या मिठायांची मागणी वाढते आहे. रोजच्या आयुष्यात साखरेला गुळाचा पर्यांय वापरण्याची निकड मांडली जात आहे.
सेंद्रिय गूळ व पावडर निर्मितीसह बाजारपेठेत ही उत्पादने अर्थकारणास गती देत आहेत. तसेच गूळापासून तयार होणार्या मिठाया व कन्फेशनरी उत्पादनाची फार मोठी संधी आहे. पण या अर्थकारणाचे लाभ उत्पादकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुढील काळात निर्मिती ते ब्रॅंडिंगपर्यंत सर्व टप्प्यांसाठी सहकार, महिला बचतगट चळवळ या सारखी क्षेत्रे सक्रिय होण्याची गरज आहे.