शास्त्रीय संगीताच्या नभातील ध्रुवतारा
परमेश्वरी वरदान लाभलेले प्रतिभावंत, भारतीय अभिजात शास्त्रीय संगीताची ध्वजा उंचावणारे किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक, ‘संतवाणी’तून रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या पंडित भीमसेन जोशी यांचा जीवनपट अद्भुतरम्यच. भारतवर्षाला मोहिनी घातलेल्या ‘या भारतरत्नाने आपल्या गुरुच्या स्मृती चिरंतन जपण्यासाठी १९५३ मध्ये सुरू केलेला सवाई गंधर्व महोत्सव जगभरातील शास्त्रीय संगीत प्रेमींसाठी पर्वनीच असतो. गायन-वादन आणि नृत्याचा त्रिवेणी संगम म्हणजे दरवर्षी डिसेंबरमध्ये होणारा 'सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव' हा स्वरयज्ञ येत्या २ फेब्रुवारीमध्ये होणार होता. पण तो ओमिक्रॉनच्या वाढत्या संक्रमणामुळे रद्द करण्यात आला. यामुळे सलग तिसऱ्या वर्षीही देशातीलच काय पण जगभरातील रसिकांची निराशा झाली आहे. भारतरत्न पं. भीमसेन जोशी जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या स्वरसाधनेचा लेखाद्वारे उलगडलेला सुरमयी जीवनप्रवास...
शास्त्रीय संगीताच्या आकाशातील तळपता सूर्य, संगीताचा महासागर, अभिजात भारतीय संगीताचे एव्हरेस्ट अशा अनेकविध विशेषणांनी नावाजलेले एकमेव नाव म्हणजे पंडित भीमसेन जोशी. खऱ्या अर्थाने सामान्य माणसापर्यंत शास्त्रीय संगीत नेणारे ते शास्त्रीय गायक होते. पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर आणि पंडित वि. ना. भातखंडे यांनी राजदरबारातून संगीत काढले आणि ते घराघरांत पोहोचवले. परंतु वारकऱ्यांपासून ते सिनेमा पाहणाऱ्या माणसाला शास्त्रीय संगीताच्या तालावर डोलायला शिकवले ते पंडितजींनीच. शास्त्रीय संगीताच्या मैफलीत धीरगंभीर ‘दरबारी’ आळवून भारदस्त वातावरण निर्मिती करणारे भीमसेनजी '‘इंद्रायणी काठी’' किंवा ‘'विठ्ठलाच्या पायी थरारली वीट'’ सारखे अभंग गाऊन भाबड्या विठ्ठल भक्तांच्या मनात सहज घर करीत. शास्त्रीय संगीताचा गंधही नसणाऱ्या सामान्य श्रोत्यापासून ते वारकऱ्यांच्या मनात माऊली-तुकोबांचे अभंग गाऊन आपल्या धीरगंभीर आणि दमदार आवाजाने भीमसेनजींनी घर केले. पहिल्या स्वरातच श्रोत्यांवर ताबा घेऊन साऱ्या मैफलीवर हुकूमत गाजविणारा गायक क्वचित दुसरा कोणी असेल!
प्रतिभा, परमेश्वरी वरदान व प्रचंड जिद्द यांचा संगम असलेल्या पंडितजींच्या जीवनाची व त्यांच्या संगीताची कहाणी अद्भुतरम्य आहे. चार फेब्रुवारी १९२२ मध्ये धारवाडजवळच्या रोण या गावात पंडितजींचा जन्म झाला. त्यांचे वडील पं. गुरुराज भीमाचार्य जोशी हे शिक्षक होते. आजोबा भीमाचार्य हे तंबोरा सुरेल वाजवित व पुराण सांगत. आई रमाबाई यांच्याकडून गोड आवाजाची देणगी पंडितजींना मिळाली. गदगच्या चन्नंप्पा नावाच्या एका संगीत शिक्षकाने पंडितजींना संगीताचे धडे दिले. वयाच्या नवव्या वर्षी वडिलांनी पेटी घेऊन दिली. पण या छोट्या शिष्याची असामान्य ग्रहणशक्ती पाहून शिक्षकाने त्याला सुयोग्य गुरू हवा, असे गुरुराज जोशी यांना सुचविले.