महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या निर्मितीची गोष्ट ...
महाराष्ट्र राज्याची निर्मिती १९६० मध्ये झाली. यावर्षी राज्य निर्माण होऊन ६२ वर्षे होत आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीवेळी राज्यात असणाऱ्या २६ जिल्ह्यांमध्ये १० ने भर पडून आजघडीला राज्यात ३६ जिल्हे आहेत. नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीची गोष्ट मोठी रंजक आहे. बासष्ठ वर्षांतील जिल्हानिर्मितीच्या या प्रवासाविषयी...
आपल्या सर्वांना ज्ञात असल्याप्रमाणे, महाराष्ट्र राज्याची निर्मिती ही सहजसाध्य घडलेली बाब नव्हती. तर ती महत्प्रयासाने साध्य केलेली गोष्ट होती. राज्याच्या निर्मिती पूर्वीचा इतिहास पाहिला असता, ब्रिटिश आमदनीत सध्याचं महाराष्ट्र राज्य (अर्थात मराठी भाषिक प्रदेश) तीन भागांत विभागला गेला होता. यामध्ये सध्याचा मुंबई, कोकण, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र हा प्रदेश तत्कालीन मुंबई प्रांतात, मराठवाडा विभाग हा निजामाच्या अधिपत्याखालील हैदराबाद या संस्थानात तर, सध्याचा वऱ्हाड आणि विदर्भ हा प्रदेश तत्कालीन मध्य प्रांत आणि वऱ्हाड या प्रांतात समाविष्ट होता.