ग्रीन एनर्जी, त्यात सोलर आणि विंड एनर्जी यांचा सध्या जगभरात बोलबाला आहे. बॅटरी ऑपरेटेड इलेक्ट्रिक वाहने हा त्यांतून पुढं आलेला महत्त्वाचा मुद्दा. मात्र, पर्यावरणाचा अभ्यास करणारे तज्ज्ञ इलेक्ट्रिक वाहनांबद्दल एक शंका उपस्थित करतात. ‘तुम्ही कोळशाचा वापर करून (भारतात ८० टक्के ऊर्जा निर्मिती कोळशापासून होते.) वीज निर्माण करणार आणि त्यावर वाहने चार्ज करून ग्रीन व्हेईकलचा टेंभा मिरवणार,’ हे चुकीचं असल्याचं तज्ज्ञ सांगतात. यावर पर्याय आहे. प्रत्येक हाउसिंग सोसायटीनं स्वतःची सोलर सिस्टिम बसवून स्वतःची वीज स्वतःचा निर्माण करणं आणि आपली वाहनं त्यावरच चार्ज करून ग्रीन एनर्जी ही संकल्पना खऱ्या अर्थानं प्रत्यक्षात उतरवणं...हे आमच्या सोसायटीनं कसं केलं आणि त्यामागचा संघर्ष कसा होता, याची ही तुम्हाला वाचायला नक्की आवडेल अशी यशोगाथा...