आशा भोसलेंना ज्या मराठी गाण्यामुळे सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार मिळाला, त्या `मना तुझे मनोगत` या गाण्यातला वाद्यमेळ पहिल्यांदा त्यांना आवडला नव्हता. मात्र, नंतर संगीतकार आनंद मोडक यांचाच विचार बरोबर होता हे त्यांनी मान्य केलं. तीन प्रतिभावान कलाकारांची प्रतिभा एकत्र आली, की काय होऊ शकतं ते सांगणाऱ्या या अप्रतिम गाण्याच्या निर्मितीची ही अतिशय विलक्षण गोष्ट.
मराठी चित्रपटसंगीतात आत्तापर्यंत जी काही कामं झाली, त्यातली काही माइलस्टोन ठरली आहेत. `पिंजरा` आणि `जैत रे जैत` हे चित्रपट असतील किंवा `या चिमण्यांनो परत फिरा रे`, `तू तेव्हा तशी`, `भेटीलागी जीवा` ही गाणी असतील, त्यांनी एक प्रकारचा धक्का दिला. सगळं बदलून टाकलं. नकळत अनेक ट्रेंड तयार झाले. मला वाटतं, गेल्या तीस वर्षांचा विचार केला, तर याच माइलस्टोनमधलं एक निर्विवाद गाणं आहे ते म्हणजे `मना तुझे मनोगत.` गीतापासून गायनापर्यंत आणि चालीपासून वाद्यवृंदापर्यंत प्रत्येक गोष्टीत उंची गाठलेलं हे गाणं. मराठी चित्रपटसंगीतातला निर्विवाद माइलस्टोन.
हे गाणं म्हणजे मास्टरपीस आहे. सुधीर मोघे यांचे शब्द कमाल आहेत, पण जास्त मार्क्स आहेत ते आनंद मोडक यांनी दिलेल्या संगीताला. काय कमाल चाल. ही चाल म्हणजे मोडकांनी तयार केलेली अक्षरशः `रोलर कोस्टर राइड` आहे. ध्रुवपद, अंतरे सगळं कमाल!! ऐकताना आपण अक्षरशः स्तंभित होतो. याच्यापेक्षा परफेक्ट, जबरदस्त चाल होऊच शकत नाही. ही चाल म्हणजे आनंद मोडक यांचं `द बेस्ट` काम आहे आणि खरं तर त्यापुढे जाऊन सांगीन, की आशा भोसले यांनी मराठीत केलेल्या `द बेस्ट` कामांपैकीही एक आहे. खूप बारकाईनं ऐकलं, तर कळेल, की त्यांनी एक अतिशय विलक्षण, वेगळा आवाज लावला आहे. तो त्यांनी फार कमी चित्रपटांत लावलाय. शब्दांवरची आणि स्वरांवरची हुकमत तर कमाल.