ऐतिहासिक वारसा लाभलेले रुबाबदार राजभवन!
महाराष्ट्राच्या राज्यपालांना अधिकृतरित्या चार निवासस्थाने असून, विशिष्ट काळात त्यांचा वापर करावा असा पूर्वीपासून संकेत आहे.
इंग्रजांच्या काळापासून राज्यपाल या पदाला असणारा संपन्न वारसा, त्या पदाची गरीमा या गोष्टी विचारात घेता त्यांच्या निवासस्थानासदेखील पूर्वीपासून एक वेगळेच महत्त्व आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे वर्षा हे निवासस्थान ज्या प्रमाणे राजकीयदृष्ट्या एक महत्त्वाचे सत्ताकेंद्र आहे, त्या प्रमाणे पूर्वीपासून अनेक ऐतिहासिक घटना-घडामोडींचे साक्षीदार राहिलेल्या राजभवनचेदेखील महत्त्व आजही अबाधित आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालांना अधिकृतरित्या चार निवासस्थाने असून, विशिष्ट काळात त्यांचा वापर करावा असा पूर्वीपासून संकेत आहे.
राज्यपाल या पदाला ब्रिटिश काळापासून एक वलय प्राप्त झाले आहे. राज्य विधिमंडळाची दोन्ही सभागृहे (विधानसभा आणि विधान परिषद) तसेच मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ यांची भूमिका राज्य कारभार करताना महत्त्वाची असली तरी कोणत्याही राज्याचे राज्यपाल हे त्याचे घटनात्मक प्रमुख असतात. घटनात्मक प्रमुख या नात्याने राज्य कारभारातील त्यांच्या भूमिका, त्यांचे विवेक अधिकार, तसेच काही वेळा एखाद्या राजकीय पक्षाशी असणाऱ्या विशेष जवळीकीमुळे त्यांना अनेकदा माध्यमांमधून टिकेला सामोरे जावे लागते. राज्यघटनेनुसार आपल्याकडे प्रत्यक्ष राज्यकारभार मुख्यमंत्री आणि त्यांनी निवडलेल्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून केला जातो. तर राज्यपाल केवळ घटनात्मक प्रमुख असल्याने त्यांना बरेचदा ‘रबर स्टँप’ म्हणून हिणवले जाते. तसेच ते केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून काम पाहत असल्याने त्यांच्यावर ‘कठपुतली’ असल्याचादेखील आरोप केला जातो.