सूर्याच्या वाढत्या प्रखरतेने सध्या महाराष्ट्र होरपळून निघतोय. एप्रिल-मे हे उन्हाळ्याच्या काहिलीचे दिवस असतात. या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील लातूरजवळील उदगीर येथे येत्या २२, २३, २४ एप्रिल दरम्यान साहित्य संमेलन होत आहे. मराठी साहित्य संमेलन हा समस्त मराठीजनांचा एक सोहळा असतो. एखाद्या सण-समारंभातून साहित्य संमेलनाकडे बघितलं जातं. तापत्या उन्हाळ्याच्या तीव्र झळा शीतल जरी झाल्या नाहीत, तरी त्या सुसह्य होतील याची खात्री संमेलनाला येणाऱ्या प्रत्येक मराठी रसिकाला असते.
मराठवाड्यात अनेक वर्षांनी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे असून, त्यांच्या काळात काही ठोस घडण्याची सुरुवात संमेलनापासूनच व्हावी, अशी साऱ्यांची अपेक्षा आहे आणि ती चुकीचीही म्हणता येणार नाही. साहित्य संमेलन आणि वाद यांचं इतकं जवळचं नातं आहे की, वाद झाल्याशिवाय साहित्य संमेलन भरविणाऱ्या संस्थांनाही साहित्य संमेलन भरवल्यासारखं वाटत नाही आणि संमेलनाला येऊ इच्छिणाऱ्या रसिकांना वाटत नाही. गेली अनेक वर्षं साहित्य संमेलन त्याच्या अध्यक्ष निवडीच्या मुद्द्यावरून गाजत होतं. मात्र गेल्या आठ-दहा वर्षांपासून अध्यक्ष निवडीचा वाद आणि त्यावरून निर्माण होणारं वादळ संपुष्टात आलं आहे. महामंडळाने अध्यक्षपदाचा भार संपुष्टात आणला असला तरी, यजमानपद आयोजक संस्थेला दिलं असलं तरी संमेलनाचे मुख्य आम्हीच हा आविर्भाव सोडलेला नाही.