‘बिबट्याचा गावात वावर’, ‘बिबट्याने पाळीव जनावराची केली शिकार’ अशा बातम्या दररोज कानावर पडत आहेत. काही दशकांपूर्वी केवळ जंगलात दिसणारा (अर्थात, अगदी जवळ असला, तरी बिबट्या प्रत्यक्षात दिसणे तसे अवघड) बिबट्या आता कुठे नाही, असा प्रश्न पडावा इतके जवळ आले आहेत. आपण गावात राहत असो वा शहरात बिबट्या सर्वत्र आढळून येत आहे. मागील आठवड्यात पुण्याजवळील दिवे घाट, वडकीनाला, कानिफनाथ डोंगर, जुन्नर, शिरूर तालुक्यात तसेच बुलडाणा, पंढरपूर, करमाळा, कऱ्हाड, नाशिक अशा विविध भागात बिबट्याचा वावर, पाळीव जनावरांवर त्यांचा हल्ला घडण्याच्या घटना घडत आहेत.
मुंबईतही जवळपास रोजच अशा बातम्या येतात. मुंबईत बोरिवली नॅशनल पार्कजवळील परिसर, गोरेगाव, आरे कॉलनी अशा परिसरात बिबट्यांचा सर्वाधिक वावर आहे. मुंबईने बिबट्यांसोबत एक प्रकारची अस्वस्थ शांतता प्रस्थापित केली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, उत्तर प्रदेशातील शेत जमीन, तसेच आसाम, तमिळनाडूमधील चहाचे मळे, तर राजस्थान, आंध्रप्रदेशातील खडकाळ प्रदेशात बिबट्यांचा वावर दिसून येतो.गेल्या जवळपास १० ते १५ वर्षांत बिबट्या माणसाच्या अधिक जवळ येऊ लागल्याचे निरीक्षण विविध तज्ञांनी नोंदविले आहेत. नेमकं काय होत असावे, बिबट्या माणसाच्या वस्ती शेजारी का येतोय, बिबट्या आणि माणूस यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी काय करायला हवे, हे जाणून घेणार आहोत.(Article on Human-leopard conflict)