अवीट गोडीची गाणी अन् त्याचे गायक, सध्या दुर्लभ झाले आहेत...
तुम्ही `पुष्पा` चित्रपट बघितलात? बघितलाच असणार! अर्थातच आवडलाही असणार. अल्लू अर्जुनचा अभिनय, खिळवून ठेवणारी कथा, अँक्शन, संवाद कमालच आहेत. त्यातली गाणी तर भन्नाट. `उं बोले या साला`, `आजा सामे मंदिर सामे` अशी गाणी तुम्ही किती तरी वेळा युट्यूबवर बघितली असतीलच पण तुम्हाला ही गाणी कुणी गायली आहेत माहीत आहे? नाही ना आठवतं! समजा हिंदी गाणी माहीत नसतील, तर तेलगू, मल्याळम भाषेत सुपरहिट झालेली गाणी तरी कुणी गायली आहेत माहीत आहे? हेही फार आठवणार नाही. बरं, हा चित्रपट जाऊ दे. गेल्या दोन-तीन वर्षात सुपरहिट झालेल्या कोणत्याही चित्रपटातली कोणतीही सुपरहिट गाणी आठवा. तुम्हाला त्यांचे शब्द माहीत असतील, चाल पाठ असेल, गायकाचा किंवा गायिकेचा आवाजही डोक्यात बसला असेल, पण त्याचं नाव तुम्हाला आठवणार नाही.
फार कशाला, मोहित चौहानची चार गाणी सांगा, बेनी दयालची गाणी सांगा, नेहा कक्करचा आवाज कुणासारखा वाटतो ते आठवा असं म्हटलं तरी जमणार नाही. बी. प्राक, जुबिन नॉटियाल, गुरू रंधवा, दर्शन रावल, मोनाली ठाकूर ही गेल्या काही काळात सुपरहिट गाणी देणाऱ्या गायक-गायिकांची नावं आहेत, असं सांगितलं तर आश्चर्यच वाटेल ना? श्रेया घोषाल, सोनू निगम, अरिजितसिंग, मोहित चौहान, सुनिधी चौहान किंवा ए. आर. रेहमान अशी अक्षरशः चार-दोन नावं सोडली, तरी ज्यांचा आवाज ऐकला की लगेच नाव कळतं अशी नावं गेल्या काही काळात राहिलेलीच नाहीत ही वस्तुस्थिती आहे. लता मंगेशकर, आशा भोसले, किशोरकुमार, मुकेश, मोहंमद रफी अशा गायकांचे आवाज आजही सगळ्यांच्या डोक्यात फिट आहेत, त्यांची गाणी कधीही ओळखता येतात, पण नव्या जमान्यातल्या फार कुणाला हे साध्य होत नाही असं दिसतंय, हे तर खरंच. गायक हा पूर्वी नव्हे-अगदी दहा-बारा वर्षांपूर्वीपर्यंत `ब्रँड` होता, पण असा ब्रँड होण्याची प्रक्रियाच बंद होत गेल्याचं आपल्याला दिसतंय. तुमच्याही लक्षात आलं असेलच ना?