मुंबई : चार जूनला लोकसभा निकालाच्या धुमाळीत अचानक नीटचा निकाल घोषित झाला आणि एकच गडबड उडाली. एकीकडे भाजप पास झाला की नापास याची चर्चा रंगत असताना वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी तयारी करणारे विद्यार्थी या खऱ्याखुऱ्या पास नापासच्या काळजीत दंग होते.
चार जूनच्या रात्री निकाल लागला पण पाच जूनपासून त्याविषयी वाद सुरू झाले. शंभर टक्के मिळवणारे तब्बल ६७ विद्यार्थी, काही विद्यार्थ्यांचं परीक्षाकेंद्र एकच असणं, त्यांच्या नावात असणारी संशयास्पद गडबड यामुळे नीटविषयीचा संशय अधिकच गडद झाला.
राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी (NEET-UG) देशभरातून २४ लाख ६ हजार ७९ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यातील २३ लाख ३३ हजार २९७ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.
परीक्षा होताना कथित पेपरफुटीचं प्रकरण झालं. तर निकाल तब्बल १० दिवस आधी लागला. परीक्षेत ६७ विद्यार्थ्यांना १०० टक्के मिळाले. एकापाठोपाठ बसलेल्या विद्यार्थ्यांना १०० गुण, त्यांची संपूर्ण नावे निकालात नमूद नसणे, त्यांना ग्रेस मार्क्स देणे हा सगळाच प्रकार आता वादाच्या केंद्रस्थानी आला आहे.
अनेक विद्यार्थ्यांनी या परीक्षेत घोळ झाल्याचा आरोप केला असून गेल्या दोन दिवसांपासून यावर एक्सवर हजारो पोस्ट पडत आहेत. त्यामुळेच हा विषय ट्रेंडिंग झालाय.
पालकांनीही याविरोधात आवाज उठवला. प्रकरण न्यायालयात गेलं. उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे.
दरम्यान या परीक्षेत दिल्या गेलेल्या मार्कांविषयी अनेकांनी आक्षेप घेतला असून विरोधी पक्षाच्या प्रियांका गांधी, कन्हैया कुमार, सचिन पायलट या सगळ्यांनी या सर्व प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.