पुणे-नाशिक पट्टयाच्या विकास रेल्वेमुळे होणार सुसाट
रेल्वे ही देशाच्या आर्थिक विकासाचा कणा समजली जाते. पुणे आणि नाशिक हा राज्यातील सर्वात श्रीमंत असा औद्योगिक आणि कृषी पट्टा आहे. या दोन प्रमुख शहरांना हायस्पीड रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हल्पमेन्ट कॉर्पोरेशन लिमिटेड (महारेल) सेमी हायस्पीड रेल्वे उभारणीचा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पास रेल्वे मंत्रालयाने नुकताच ग्रीन सिग्नल दिला आहे. या प्रकल्पामुळे पुणे नाशिक रस्त्यावरील वाहतुक कमी होण्याबरोबरच वेळेची बचत, इंधनाची बचत, प्रदुषण कमी होण्याबरोबरच कृषी व औद्योगिक क्षेत्राला फायदेशीर ठरणार आहे. (MAHARAIL Pune-Nashik project )
हा रेल्वे मार्ग पुणे, नगर आणि नाशिक या तीन जिल्हयातून जाणार आहे. चाकण, राजगुरूनगर (खेड), मंचर, नारायणगाव, आळेफाटा, संगमनेर आणि सिन्नर येथील महत्वाचे उद्योग, विशेष आर्थिक क्षेत्र व कृषी केंद्रांना जोडण्यात येणार आहे. सुरक्षित व जलद वाहतुकीसाठी हा रेल्वे मार्ग अनेक अर्थाने फायदेशीर ठरणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रतितास २०० किलोमीटर या वेगाने या मार्गावरील रेल्वे धावणार आहे. भविष्यात हा वेग प्रतितास २५० किलोमीटरच्या वेगाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पुणे ते नाशिक हे अंतर १ तास ४५ मिनिटांवर आल्याने प्रवाशांच्या वेळेतही बचत होईल. देशातील सर्वात कमी किंमतीचा सेमी हायस्पीड रेल्वे कॉरीडॉर असणार आहे. एवढेच नव्हे, तर रेल्वेचा हा संपूर्ण मार्ग नव्याने आखणी करण्यात आल्यामुळे पुणे ते नाशिक या २३५ किलोमीटर लांबीच्या पट्ट्यांच्या विकासाला गती मिळणार आहे. रस्ते वाहतुकीबरोबरच रेल्वेमुळे पर्यायी वाहतुक व्यवस्था यानिमित्ताने या भागात उभी राहणार आहे. शेती, औद्योगिक क्षेत्राबरोबरच या भागातील जमिनींच्या किंमतीमध्ये मोठी वाढ होणार आहे. पर्यायाने याचा लाभ या मार्गाच्या दोन्ही बाजूस असलेल्या गावांना होणार आहे.