ऐतिहासिक मस्तानी तलावाकडे दुर्लक्ष, साठलाय 50 हजार ब्रास गाळ...
पुण्याहून सासवडला जाताना दिवेघाटात वरती पोहोचले की, डावीकडे दरीत एक आखीव-रेखीव तलाव लक्ष वेधून घेतो, तोच मस्तानी तलाव. इ.स. १७४० पूर्वी पेशवेकाळात या तलावाचे निर्माण झाले असा इतिहास आहे. यासंदर्भात काही आख्यायिका सांगितल्या जातात. जसं की, वीरयोद्धा बाजीराव पेशवे विश्रांतीसाठी इथे या तलावावर येत. मस्तानी देखील अंघोळीसाठी याठिकाणी येई वगैरे. परंतु, याव्यतिरिक्त तलावाच्या निर्माणात जलविषयक तांत्रिकता म्हणून नेमक्या काय-काय गोष्टी आहेत ते समजून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न या लेखात केला आहे.
मस्तानी तलावाची जागा, तो परिसर आणि तलावाचे बांधकाम यासंदर्भात फारशी ऐतिहासिक लेखी माहिती उपलब्ध नसली, तरी भूजल वैज्ञानिक म्हणून सहज जलबोधकारचे उपेंद्र धोंडे यांनी या स्थळाला भेट देऊन निरिक्षण केल्यास बऱ्याच गोष्टी आढळतात. ज्यातून तलावनिर्माणशास्त्र संबंधी जल कार्यकर्त्यांना एक छान दृष्टी मिळते. थोरल्या बाजीरावांनी या तलावाचे निर्माण करताना या जागेचा व भोवतालच्या परिसराचा चांगलाच अभ्यास केला होता. हे सहजपणे लक्षात येते. हे पाणलोट नेमकं कोणत्या आकाराचे आहे? परिसरातील पर्जन्यमान आणि स्थानिक डोंगर भुरूपे (चढ-उतार) यानूसार तिथली जल अपधाव स्थिती कशी राहील? सदर तलाव निर्माणाचे नेमके उद्देश्य कसे साधतील? या साऱ्यांचा अतिशय तपशीलवार विचार केलेला आढळतो.
ऐतिहासिक दस्तावेज म्हणावं तर, या संदर्भात पुण्याच्या पेशवे दप्तरात एक स्वतंत्र पत्रच आहे ज्यात असे वर्णन आहे की –
‘सेवेसी जगन्नाथ नागेश विज्ञापना ऐसीजे. छ. १२ मोहरमी.. सेवेशी विनंती हेच की, पहिले पूर्वाचे नक्षत्राचे पाणी, लांबी उत्तरदक्षण तिही बुरुजांमध्ये सुमारे १०० हात व रुंदी पूर्व पश्चिम अशी नव्वद व खोली कोठे तीन हात कोठे चार हात येणेप्रमाणे होते पु(ढे) उत्तराचे दोन-तीन पाऊस बरेच पडले. पूर्वेकडील दोन्ही खोऱ्यांतील ओढे व दक्षणेकडील तल्याचे पालीबाहेरील ओढे जिले वाहो लागले. ते खणोन बांधोन आणून तल्यात आणिले आहेत..सदरहू लि।। प्रमाणे लिंगोजी निंबाणेकर व कुसाजी गायकवाड यांनी आपले नजरेने पाहिले.
तलावाचे आकारमान:
दस्तऐवजातली माहिती आणि वर्तमान स्थिती पाहता मुळ तलाव आकारमानात थोडेफार बदल दिसतात. एकूण १४ एकर क्षेत्र हे तलाव साठाक्षमता म्हणून व्यापलेले आहे. तर, तलावाचे प्रभावक्षेत्र हे साधारण ३०० ते ४०० एकर गृहीत धरले गेले आहे. तलावाचा आकार हा अंडगोलाकार असून सरासरी लांबी २४० मीटर (कमाल लांबी ३०० मीटर) तर सरासरी रूंदी १५० मीटर (कमाल रूंदी २४० मीटर) आहे. खोली कमाल १५ मीटर ते किमान ०५ मीटर (सरासरी ०८ मीटर) आढळते.