मागील दोन वर्षांपासून कलाकारांचा जीवनसंघर्ष सुरू
सगळं सोंग घेता येतात, पण पैशाचं सोंग घेता येत नाही. संसाराचा गाडा ओढायचा, तर कामाची लाज बाळगून कसं चालंल? घरातील चिलीपीलींच्या पोटाची खळगी भरण्यासाठी दुसऱ्याच्या शेतावर मोलमजुरी करायला जात आहे, ही व्यथा आहे तमाशा फडातील एका महिला कलाकाराची...
राज्य सरकारने लॉकडाउनकाळात समाजातील अनेक घटकांना सर्वोतोपरी मदत केली, मात्र अद्याप तमाशा कलावंतांना कोणतीही मदत न मिळाल्याची खंत सुप्रसिद्ध तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी व्यक्त केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘सकाळ’च्या माध्यमातून खेडकर यांच्याशी संवाद साधला असता भावनांना त्यांनी वाट मोकळी करून दिली.
तमाशा ही कला महाराष्ट्रात सतराव्या शतकापासून कार्यरत आहे, पण ही कला कोराना काळात आर्थिक संकटात सापडली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १६ मार्च २०१९ रोजी कार्यक्रम बंद झाले. म्हणजे ज्या दिवसापासून कार्यक्रम सुरू होतात, त्याच दिवसापासून आम्हाला घरी बसावं लागले. राज्यातील एकूणच सर्वच तमाशा कलाकारांवर दोन वेळची चूल पेटण्यासाठी ससेहोलपट सुरू आहे. ज्या लोककलावंतांना स्टेजवर अनेकदा वन्स मोर दिला जायचा, आज त्याच महिलांना एकवेळ जेवणासाठी पडेल ते काम करावं लागत आहे. काही मुली धुण्या-भांडीची कामे करीत आहे, कोणी रस्त्यावर भाजीपाला विकत आहे, कोणी गवंड्याच्या हाताखाली काम करीत आहे, तर कोणी रिक्षा चालवून संसाराचा गाडा हाकत असल्याचे खेडकर यांनी नमूद केले.