माझं गाव कोकणातलं आहे, असं म्हटल्यावर अनेकदा विचारला जाणारा प्रश्न म्हणजे तुमच्याकडे ते कोंबडी वडे हा जो प्रकार असतो तो नेमका काय असतो. त्यातून अनेकजण घाईघाईत स्वतःच अर्थ लावून सांगतात की कोंबडी पासून तयार केलेला वडा असेल वैगरे. मग हासू आवरत सांगायचं की नाही असं नाही कोंबडी वडा हा शाकाहारीच पदार्थ आहे. नाव फक्त त्याच नाॅनव्हेजिटेरीयन आहे. तो व्हेज आणि नाॅनव्हेज दोन्ही पदार्थांसोबत खाऊ शकतो. मटण अन् कोंबडीच्या कालवणाची लज्जत चाखायची असेल तर ती कोंबडी वड्यांसोबत एकदा नक्कीच चाखावी. नाॅनव्हेज खात नसाल तर चहा, काळ्या वाटाण्याची भाजी किंवा मटकीच्या भाजी सोबतही कोंबडी वडे खाऊ शकता बरं का. कोंबडी वडे हा प्रकार नेमका आहे तरी काय? तो बनवायचा अन् त्याची चव द्विगुणित करणारे कोकणी पद्धतीचे कालवण कसे बनवायचे जाणून घेऊयात या लेखातून...
भात आणि मासे खायचे तर कोकणातच. वेगवेगळ्या नावीन्यपूर्ण पदार्थांची चव कोकणी पदार्थांमध्ये चाखायला मिळते. कोकणात तांदूळ हे प्रमुख पीक घेतले जाते. त्यामुळे कोकणवासियांच्या आहारात तांदळाचे उपपदार्थ अधिक पहावयास मिळतात. या पदार्थांसोबत चवीसाठी मांसाहाराचा समावेश अधिक केला जातो. सुकी मच्छी, माशांचे कालवण, घावन, भात, कुळीथ, डांगर, आंबोळी, भाताची पेज आदी पदार्थांचा कोकणवासियांच्या आहारात समावेश असतो. याबरोबरच कोंबडी वडे आणि कोंबडीचे कालवण हे सुद्धा सरार्स आहारात दिसते. रविवार, बुधवार, शुक्रवार असो की कोणी पाहुणे येणार कोंबडी वड्यांचा खास बेत ठरलेलाच असतो. सागुती वडे म्हणून मालवणमध्ये कोंबडी वडे ओळखले जातात. कोंबडी वडे म्हणजे एकाच पदार्थामध्ये दोन पदार्थांची नावे आहेत.
२ वाटी तांदूळ, १ वाटी ज्वारी, पाव वाटी उडीद डाळ, १ वाटी हरभरा डाळ, १ चमचा मेथीचे दाणे, १ चमचा धने, १ चमचा बडीशेप, तळण्यासाठी तेल
प्रथम तांदूळ धुवून सुकवून घ्यावेत. तांदूळ धुणे शक्य नसल्यास ओल्या कापडाने पुसून घ्यावेत. त्यानंतर मध्यम आचेवर तांदूळ भाजावेत. त्याप्रमाणे उडीद व हरभरा डाळ धुवून सुकवून घ्यावी किंवा ओल्या कापडाने त्यावरील पावडर पुसून काढावी. तांदळाप्रमाणे डाळी, ज्वारी, मेथीचे दाणे, धने भाजून घ्यावेत. सर्व साहित्य थंड झाल्यावर एकत्र करून भरडसर दळून आणावे.
वडे मऊ लुसलुशीत होण्यासाठी आपण भात मिक्सरवर बारीक करून पीठ भिजवताना एकत्र करू शकतो. तसेच वड्यांना छान रंग येण्यासाठी किंचित हळद पीठ भिजवताना वापरल्यास वडे पिवळसर सोनेरी रंगाचे होतात. या वड्यांमध्ये प्रत्येकजण आपल्या आवडीप्रमाणे इतर पदार्थ मिक्स करतात. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा वापरला जातो किंवा वड्याला गोडपणा येण्यासाठी काकडीही बारीक किसून वापरली जाते. वडे करायच्या आदल्या रात्री पीठ भिजवून ठेवले, तर वडे मऊ होतातच आणि फुगतातही चांगले. जर शक्य नसेल तर ज्या दिवशी वडे करायचे आहेत त्यादिवशी पीठ भिजवल्यानंतर थोडावेळ मुरत ठेवावे. मध्यम आचेवर तेल तापवावे. पोळपाटावर स्वच्छ धुतलेले सुती कापड किंवा प्लास्टिकचा पेपर अंथरूण त्यावर पाण्याचा ओला हात फिरवावा. पुरीच्या आकाराचा वड्याच्या पिठाचा गोळा घेऊन वडा थापावा. त्यानंतर अलगद कापड किंवा प्लास्टिक पेपर वापरला असेल तो उचलून हाताने वडा तापलेल्या तेलात सोडावा. हलकेच चमच्याने तेल वड्यावर टाकावे म्हणजे वडा दोन्ही बाजूंनी मस्त फुगतो. छान पिवळसर रंग आल्यावर गरमागरम वडा काढून झणझणीत कोंबडीच्या कालवणासोबत सर्व्ह करावा.
४ ते ५ कांदे
अर्धी वाटी खोबर
लसूण १ कांडी
आलं अर्धा इंच
कोथिंबीर
मिरची पावडर ३ ते ४ चमचे
मीठ चवीप्रमाणे
तेल
अर्धा किलो चिकन
कांदे चिरून मंद आचेवर भाजावेत. खोबर किसून घेऊन ते ब्राऊन रंग होईपर्यंत भाजावे. त्यात बारीक चिरलेले आलं व लसूण टाकून घ्यावे. भाजलेले मिश्रण थंड झाल्यावर कोथिंबीर टाकून मसाला मिक्सरवर बारीक करून घ्यावा. कढईत तेल तापवून वाटलेला मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यावा. त्यानंतर त्यात चवीप्रमाणे लाल तिखट टाकावे. त्यात चिकन टाकून पाणी टाकावे. साधारण २५ ते ३० मिनीट भाजी शिजत ठेवावी. खूपच घाई असेल तर कुकरच्या ३ शिट्या करून भाजी करता येते. भाजी शिजल्यावर त्यावर कोथिंबीर टाकावी. त्यामुळे आपल्या भाजीची चव अधिक रुचकर होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.