- तनिष्का डोंगरे
तुमच्या पर्यटनाच्या यादीमध्ये कास पठार हे नाव निश्चितच असेल. काही जणांनी तर भेटही दिली असेल. परंतु, ज्यांनी अजून हे पठार पाहिले नाही त्यांना मात्र आता येथे फुलांऐवजी फक्त पठाराचे दर्शन होणार आहे. हो हे खरं आहे. येथे येणाऱ्या फुलांचे प्रमाण आता कमी झाले आहे. काय आहेत त्याची कारणे? पर्यटकांचा वाढता लोंढा की, अजून काही? या पर्यावरण ऱ्हासाला कोण जबाबदार? असे अनेक प्रश्न तुम्हालाही पडले असतील. झालेली ही हानी भरून निघेल की, आता फक्त पुस्तकांमध्येच येथील फुले पहावयास मिळणार या प्रश्नाचे उत्तर आगामी काळातच मिळेल.
जैवविविधतेचा हॉटस्पॉट असलेले आणि सन २०१२ मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट केलेले कास पठार सर्वांना परिचित आहे. या ठिकाणी येणाऱ्या फुलांमुळे हे पठार पर्यटकांना खुणावते. पठाराची ओळख पर्यटकांना होण्यापूर्वी येथे ट्युलिप्ससारखी फुले असतील असा अनेकांचा भ्रम होता. परंतु, येथे आल्यावर लक्षात येते की येणारी फुले अतिशय छोटी आहेत, की जी पाहण्यासाठी आपल्याला नजर तीक्ष्ण ठेवावी लागते. याशिवाय छायाचित्राच्या माध्यमातून या फुलांचे बारकावे पाहता येतात.