हाडाचं काडं आणि रक्ताचे पाणी करत, रोज सकाळी सात वाजल्यापासून रात्री मध्यरात्री अडीच अडीच वाजेपर्यंत शाळेची गुणवत्ता सुधारण्यासाठी राब राब राबलो. यासाठी तहान-भूक हरवून बसलो. वृद्ध आई-वडील, बायको आणि स्वतःच्या मुलाबाळांनाही वेळ देऊ शकलो नाही. इतकेच काय, शिक्षकी सेवेतील आतापर्यंतच्या २५ वर्षाच्या कार्यकाळात एकही दिवस रजा घेतली नाही. यासाठी मला माझ्या कुटुंबीयांसोबतच शाळेतील विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनीही खंबीर साथ दिली. यामुळेच वाबळेवाडी येथील जिल्हा परिषदेची शाळा ही आंतरराष्ट्रीय शाळा बनली. ज्या शाळेला आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा प्राप्त करून देण्यात यशस्वी ठरलो, दुर्दैवाने त्याच शाळेचा प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असताना निष्काळजीपणा, हलगर्जीपणा आणि कर्तव्यात कसूर असा ठपका ठेऊन मला केवळ राजकीय आकसापोटी निलंबित केले जाते, हे अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे.