काय सुरु आहे पुणे महापालिकेत?
पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात पुणे महापालिकेच्या निवडणुका होत आहे.
पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात पुणे महापालिकेच्या निवडणुका होत आहे. त्या दृष्टीने महापालिकेतील राजकारण हळुहळू तापू लागले आहेत. या निवडणुकांची झलक नुकत्याच झालेल्या पीएमआरडीएच्या पुणे महानगर नियोजन समितीवर ३० सदस्य निवडून देण्याच्या निवडणुकीत दिसून आली. युती आणि आघाडीतील मित्र पक्षावर दबाव टाकण्याबरोबरच सोयीनुसार एकमेकांना मदत करण्याचे प्रकार पाहावयास मिळाले. येत्या काही दिवसात हे प्रकार आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहराच्या राजकारणात हळू हळू रंगत भरु लागली आहे.
मागील निवडणुकीचा इतिहास
महापालिकेची २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत चार सदस्यांचा एक प्रभाग या पद्धतीने झाली होती. त्यावेळी एकूण ४२ प्रभाग होते. या निवडणूका भाजपला बहुमत मिळाले. कारण राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता होती. प्रभाग रचनेची सुत्रे त्यावेळी सरकारच्या हाती म्हणजे भाजपकडे असल्यामुळे हवे तसे बदल आणि हवी तशी मोडतोड करून प्रभाग रचना करण्यावर भाजपने भर दिला. त्याचे फळ भाजपला मिळाले आणि महापालिकेत भाजपची एक हाती सत्ता आली. शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम केले तर काय होते, हे त्यावेळी भाजपने दाखवून दिले. परंतु प्रभाग रचनेचे खरे महत्त्व भाजपला यापूर्वी २००२ मध्ये तीन सदस्यांचे मिळून एक प्रभाग या पद्धतीने झालेल्या निवडणुकीत कळाले. त्यावेळी एकूण ४८ प्रभाग होते. त्यामध्ये दोन प्रभाग हे चार सदस्यांचा मिळून एक प्रभाग असे होते. त्यावेळी भाजपचे सर्वाधिक म्हणजे ३५ भाजपचे नगरसेवक निवडून आले होते. तर शिवसेनेचे २१ नगरसेवक निवडून आले होते. त्यावेळी शिवसेना-भाजप युतीमध्ये लढले होते. एक अथवा दोन ऐवजी बहुसदस्यी प्रभाग पद्धतीने निवडणुका झाल्या, तर स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेण्यात यश येऊ शकते, हे लक्षात आल्याने २०१७ च्या निवडणुकीत त्याचा फायदा पक्षाला करून घेता आला.