डॉ. माधव शिंदे
अनेक विकसित देशांमध्ये प्राथमिक शिक्षण पूर्णत: मोफत दिले जाते. तर शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणाच्या शुल्कांवरही सरकारचे कठोर नियंत्रण असते. आपल्याकडचे चित्र वेगळे आहे. त्यात सुधारणा केल्याशिवाय शाश्वत विकास उद्दिष्टे पूर्ण होणे शक्य नाही.
संयुक्त राष्ट्रांनी सन २०३० पर्यंत शाश्वत विकास साध्य करण्यासाठी १७ उद्दिष्टे ठेवलेली आहेत. जगातील दारिद्र्य, बेरोजगारी, उपासमार, कुपोषण दूर करत दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून सभ्य रोजगारनिर्मितीद्वारे आर्थिक संपन्नता प्राप्त करण्याच्यादृष्टीने सर्वच उद्दिष्टे महत्त्वाची आहेत.
ती पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची १६९ लक्ष्ये निर्धारित करण्यात आलेली असून जगातील सर्वच देश या दिशेने जाण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहेत.
या १७ उद्दिष्टांमध्ये ‘सर्वसमावेशक आणि दर्जेदार शिक्षण’ हे चौथे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. लोकांना सर्वसमावेशक, समान आणि दर्जेदार शिक्षण उपलब्ध करुन देण्याचे या उद्दिष्टांतर्गत नमूद करण्यात आलेले आहे.