हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार ही उपाधी पहिल्यांदा खऱ्या अर्थाने मिरविली ती राजेश खन्ना यांनी. त्या आधी हिंदी चित्रपटसृष्टीत दिलीप कुमार हा सुपरस्टार मानला जात असे. त्याच्या काळात राज कपूर, देव आनंद हे अन्य मोठे अभिनेते होतेच; पण दिलीपकुमारचा स्वतःचा म्हणून एक करिष्मा होता. त्याचा म्हणून खूप मोठा चाहता वर्ग होता, मात्र राजेश खन्नाने चाहत्यांचे आणि हिंदी चित्रपटातल्या नायकाचे गणितच बदलले. लोकप्रियतेचे निकष वेगळे ठरवायची वेळ राजेश खन्नाच्या चाहत्यांमुळे आली. राजेश खन्नाची लोकप्रियता वेगळीच होती. हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासाकडे नजर टाकली तर दिलीप कुमारच्या आधी कोणी इतकी लोकप्रियता मिळविली नव्हती. लोकप्रियतेचा अर्थातच स्टारडमचा मान दिलीप कुमारकडे जातो. मात्र त्यावर कळस चढविला तो राजेश खन्नाने. एखाद्या नटाची लोकप्रियता काय असते याबद्दलच्या दंतकथा निर्माण झाल्या त्या राजेश खन्नापासून; पण या सगळ्यांवर मात केली ती अमिताभ बच्चन या जित्याजागत्या दंतकथेने. अमिताभ बच्चन यांची कारकीर्द सुरू झाली १९७० मध्ये. नुकताच अमिताभ बच्चन यांनी ८० व्या वर्षात प्रवेश केला. त्याच्या चित्रपट कारकिर्दीला ५० वर्षे होऊन गेली, मात्र त्याच्या लोकप्रियतेचे गारूड आजही टिकून आहे. दर दहा वर्षांना एक पिढी बदलते असा हिशेब केला तर अमिताभने सहा पिढ्यांना प्रभावीत केले आहे.