सावरकरः वादळातही अढळ दीपस्तंभ

सावरकरः वादळातही अढळ दीपस्तंभ

Published on

अंदमानातील हालअपेष्टा सावरकरांना सहन कराव्या लागल्याच, पण तेवढ्याच तीव्रतेने त्यांना विपर्यास, उपेक्षा, हेत्वारोप अशा अनेक गोष्टींना तोंड द्यावे लागले. हयातीतच नव्हे तर निधनानंतरही. त्यांच्या वैचारिक भूमिका आणि कार्याची दिशा समजून घेण्याचा म्हणूनच प्रयत्न करावा लागतो.


राजकारणाच्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या स्वतः चे नेतृत्व प्रस्थापित करू पाहणाऱ्या व्यक्ती आयुष्यात कितीतरी गोष्टीचा त्याग करतात, हे खरे असले तरी त्यांच्यातील 'लोकेषणा' लपत नाही. लोकांच्या नजरेत आपण नेहमी चांगलेच असलो पाहिजे; त्या दृष्टीने त्यांच्या भावना जपणे, त्यांना चुचकारणे असा प्रयत्न बहुतेक नेत्यांचा असतो. सावरकरांनी मात्र समाजहिताचा, बुद्धीच्या कसोटीवर पारखून घेतलेला विचार सांगताना कोणताही आडपडदा ठेवला नाही. रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, अपसमज यांच्यावर तर्कबुद्धीच्या आधारे सपासप वार करतांना स्वकीयांचा रोष ओढवून घेतला "वर जनहितं ध्येयम् केवला न जनस्तुतिः' याचे उदाहरण त्यांनी घालून दिले. असे कितीतरी प्रसंग सांगता येतील. १९२९मध्ये पुण्यात पर्वती मंदिर सत्याग्रह झाला. देवदर्शनाच्या हक्कासाठी सत्याग्रह करणाऱ्या पूर्वास्पृष्यांना सनातन्यांनी बेदम मारहाण केली. त्या घटनेनंतर 'पुण्यातील तीन हजार मंबाजीबुवा' हा लेख सावरकरांनी लिहिला. 'हे कलियुग असल्याने प्रत्येक पिढी पूर्वपिढीपेक्षा मूर्ख होत जाणारच आणि सात पिढ्यांनंतर लोकांचा मूर्खपणा सातपट वाढणारच', हे लेखातील मंबाजीबुवांच्या तोंडून वदवलेले उद्गार सावरकरांच्या उपहासात्मक शैलीचा उत्कृष्ट नमुना आहे.

कृतिशील सुधारक


जातिव्यवस्था, चातुर्वर्ण्य, हिंदू समाजाला जखडून टाकणाऱ्या सात बेड्या याच्या विरोधात लेखणीच्या साहाय्याने ते रान उठवीत होते. 'दर्शनाने बाटतो, तो देव कसला' हा त्यांचा मर्मभेदक प्रश्न. गाय हा उपयुक्त पशु आहे, अशी भूमिका घेणारे सावरकरच होते. अंदमानातील तुरुंगवास भोगून परतल्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला जे वलय लाभले होते, त्याचा उपयोग सावरकरांनी स्वतःचे प्रस्थ वाढ वाढविण्यासाठी केला नाही. आपली सारी पूर्वपुण्याही त्यांनी अक्षरश: समाजसुधारणेसाठी पणाला लावली. रत्नागिरीत अनेक सामाजिक संस्था, मंडळे त्यांना आपल्या कार्यक्रमांसाठी बोलवायला येत. सावरकर त्यांना पहिली अट घालत की दलितांसह सर्व जातींच्या लोकांना कार्यक्रमाला प्रवेश असेल तरच मी येईन. केवळ एवढ्यावरच ते थांबले नाहीत. एका पाठोपाठ एक कार्यक्रम, उपक्रम चळवळींचा त्यांनी धडाकाच लावला. मंदिरप्रवेश, सहभोजने, शाळांमध्ये दलित व सवर्ण विद्यार्थ्यांना एकत्र बसवले जावे यासाठीचे प्रयत्न; सर्व जातींसाठी खुले असलेले उपाहारगृह असे कितीतरी उपक्रम राबवून सामाजिक समतेचा विचार रुजविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. याला सनातन्यांकडून प्रचंड विरोध झाला. लोणी येथे भरलेल्या सनातनी धर्मपरिषदेने सावरकरांच्या निषेधाचा ठराव केला होता.

'स्वेच्छाचार प्रवर्तक नि धर्मभावना विघातक वाङ्मयाद्वारा समाजाचा बुद्धिभेद करणारे सावरकर' अशी या ठरावात त्यांची संभावना करण्यात आली होती. स्वातंत्र्यवीरांचा दीर्घकाळ सहवास लाभलेले ना. स. बापट यांनी सावरकरांच्या अनेक आठवणी लिहिल्या आहेत. त्यात स्वकीयांकडून सावरकरांना कशा प्रकारे निंदेचे घाव सहन करावे लागले, याची माहिती दिली आहे. ते लिहितातः
‘‘...समाजसुधारकाला आपल्या कार्याची ज्योत अंधारात आणि वादळवाऱ्यात स्वतःच्या जीवनाचा आधार तिला करून अतिशय कष्टाने तेवत ठेवावी लागते. त्या वेळी जो खचत नाही, जो निरुत्तेजित होत नाही आणि विरोधी वातावरणात ज्याच्या हातातील नंदादीप विझत नाही, तोच काळाला काहीसा पुरून उरतो. तात्यांनी निंदानालस्ती काही कमी सोसली नाही. हिंदूंच्या कालविपर्यस्त सनातनी रूढीच्या तटांच्या बुरुजांवर, आपल्या तर्कशुद्ध प्रखर प्रचाराच्या तोफा वर्षानुवर्षे डागणाच्या त्या पुरुषाला जर आपला शत्रू समजावयाचे नाही, तर ते अडाणी सनातन दुसऱ्या कुणाला आपला शत्रू समजणार? युक्तिवादांचे त्यांचे मुद्दे हरले की विषारी निंदांचे असभ्य व अन्याय्य गुद्दे ते तात्यांना मारू लागत... सनातन्यांची काही टीका खरोखरच अतिशय निंद्य प्रकारची असे. त्यातली काही तर लेखणीने कागदावर लिहिण्यासारखी नाही."


कशा प्रकारचे वार सावरकरांना झेलावे लागत होते, याची कल्पना या लिखाणावरून येते. बापट अनेकदा सावरकरांशी या विषयावर बोलत. हा विषय निघाला असताना एकदा सावरकरांनी त्यांना सांगितले, "एका भयंकर वादळात एक राजहंस व कावळ्यांचा एक थवा एका ठिकाणी आले. त्या राजहंसाला पाहून कावळ्यांना वाटले, की आपल्यासारखाच एक कावळा काही रोग होऊन निराळा दिसू लागला आहे, व तो आपल्याला संकट निर्माण करणार आहे, असे वाटून ते सर्वजण त्याला मारण्यासाठी टोचू लागले. तशीच माझी स्थिती या बालेकिल्ल्यात रत्नागिरीला झाली आहे." (स्मृतिपुष्पे ) पण अशा वातावरणातही सावरकरांनी आपल्या विचारांशी यक्तिंचितही तडजोड केली नाही. त्यांना झालेला विरोध आणि नालस्ती एवढ्यावर थांबत नाही. त्यांना टोचे मारण्याचे काम सनातन्यांकडून झालेच, पण स्वतःला प्रागतिक, सुधारणावादी, बुद्धिवादी म्हणवून घेणाऱ्यांनी तरी कुठे सावरकरांची तळमळ, त्यामागची भूमिका आणि त्यांची चळवळ समजून घेतली? रत्नागिरीतील त्यांचे कार्य पाहून महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, भाई माधवराव बागल यांनी जाहीररीत्या समाधान व्यक्त केले; पण अशा प्रकारचे कौतुकोद्गार अपवादानेच सावरकरांच्या वाट्याला आले. वाट्याला आली ती निंदा, उपेक्षा आणि हेटाळणी. त्यांच्यावर टीका करतानाही त्यात पूर्वग्रहांचा अन् काही वेळा द्वेषाचाही भाग होता. तसे नसते तर त्यांचे नसलेले विचार त्यांच्या तोंडी घालून त्यांच्यावर झोड उठविण्याचा खटाटोप कशाला झाला असता ? त्यावेळच्या प्रचलित प्रवाहाला छेद देणारे असे काही ते मांडत होते, हे त्यांच्यावरील रागाचे मुख्य कारण होते.

आदर्श विश्वराष्ट्राचा, वास्तव राष्ट्रवादाचे


त्यांच्या नजरेसमोर कोणता आदर्श समाज होता? अंदमानातून आपल्या भावाला पाठविलेल्या पत्रात सावरकर म्हणतात, "ज्यात सर्व मनुष्यजातीचा समावेश होईल आणि जेथील एकूण एक स्त्रियांना आणि पुरुषांना ही पृथ्वी, हा सूर्य, ही भूमी आणि हा प्रकाश हीच मनुष्याची खरी पितृभूमी आणि मातृभूमी असे वाटेल आणि आणि ह्यापासून मिळणाऱ्या लाभासाठी प्रयटन करण्याचा आणि त्यांचा उपभोग घेण्याचा समान अधिकार राहील, असे संपूर्ण जगाचे एक राष्ट्र हे आमचे ध्येय आहे.... सर्व राष्ट्र ज्यात एकरूप होऊन जातील, असे विश्वराष्ट्र प्रस्थापित करणे, हेच सर्व राजकीय विद्याशाखा आणि कला यांचे ध्येय आहे किंवा असावयास हवे, हे तत्त्व आम्हास मान्य आहे." मात्र जे असायला हवे, ते आहेच, असे समजून चालणे त्यांना अजिबात मान्य नव्हते. विश्वराज्याचे कल्पनाचित्र वास्तवापासून खूपच दूर आहे, याची जाणीव सावरकरांना होती. आंतरराष्ट्रीय राजकारण आणि इतिहासाचा गाढा अभ्यास असलेल्या सावरकरांना जागतिक राजकारणाचे वर्तमानातील चलन 'राष्ट्रवाद' हेच आहे, हे कळले होते. त्यामुळे आपले राष्ट्रदेखील चळकट झाले पाहिजे. स्वातंत्र्य मिळविण्याइतकेच ते टिकवणे महत्त्वाचे आहे, हा विचार त्यांना अत्यंत महत्त्वाचा वाटला. मुस्लीम लीगचे राजकारण देशाच्या विघटनाकडे नेणारे आहे, हे ओळखून त्याविरोधात देशभर झंझावाती प्रचार सावरकरांनी केला, त्याचबरोबर सैनिकीकरणाचे, शस्त्रबळाचे महत्त्व ठासून सांगितले. राष्ट्रजीवनाचे इतरही अनेक पैलू असतात, हे काय त्यांना माहीत नव्हते? पण भारतात १८५० च्या सुमारास सुरू झालेल्या प्रबोधन पर्वात अशा अनेकानेक पैलूंची चर्चा नुसती सुरूच होती, असे नाही, तर स्वतंत्र भारताच्या जडणघडणीची दिशाही त्या चर्चेतून बव्हंशी निश्चित झाली होती. भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे हे एक अभिमानास्पद असे वैशिष्ट्य आहे. ब्रिटिशांची राजवट येथून हटविण्याचा जोरदार प्रयत्न तर या लढ्याने केलाच; पण त्या प्रबोधन पर्वाशी या लढ्याचा अतूट संबंध होता.

व्यापक मंथनातील सावरकरी वाटा


त्यामुळेच "ब्रिटिश हटाओ' आंदोलनाच्या जोडीनेच स्वतंत्र भारताच्या वाटचालीचा आराख करण्याचे काम याच उत्कटपणे सुरू होते. देशाच्या स्वातंत्र्य लढ्याला लाभलेले हे वैचारिक परिणाम किती महत्त्वाचे होते. हे आशिया-आफ्रिकेतील इतर अनेक नवस्वतंत्र्य देशाची स्थिती पाहिल्यानंतर लक्षात येते. यात भारतात लोकशाहीचा जागरच सुरू होता, असे नाही तर लोकशाही शासनपद्धतीचा मर्यादित का होईना, अनुभव भारतीयांना मिळत होता. या शंभर वर्षांत देशात सुरू असलेल्या वैचारिक मंधनात देशातीलच नव्हे तर जगभरातील घटना पडामोडींना प्रतिसाद दिला जात होता. स्वतंत्र भारताच्या वाटचालीचे जे ठळक आधारभूत घटक आपल्याला दिसतात, त्यांना शतकभर चाललेल्या त्या वैचारिक घुसळणीची पार्श्वभूमी होती. भारताने त्या वेळी स्वीकारलेल्या मिश्र अर्थव्यवस्थेपासून अलिप्ततेच्या धोरणापर्यंत, सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्या तत्त्वापासून ते आर्थिक सामाजिक न्यायाच्या उद्दिष्टापर्यंत अनेक घटकांकडे आपल्याला या दृष्टिकोनातून निर्देश करता येतो. पण त्या मंथनातून काहीसा निसटलेला, अभावानेच चर्चिला गेलेला विषय होता तो म्हणजे देशाचे संरक्षण. सर्वांप्रति मैत्रीची भावना ठेवणान्या, शांतता, सद्भाव यावर विश्वास ठेवणाऱ्या भारतावर कोण कशाला आक्रमण करेल, या धारणेतील धोका ओळखणाऱ्या सावरकरांनी आधुनिक राष्ट्राच्या संरक्षणव्यवस्थेविषयी सातत्याने जागर घडवला. त्या व्यापक वैचारिक मंथनातला आपला वाटा उचलला. 'देशाच्या सीमा सांभाळा', असे स्वतंत्र भारताच्या राज्यकर्त्यांना त्यांना सांगावे लागलेच. पण स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच याविषयी ते प्रयत्नशील होते. जवळ जवळ एकाकी असा हा लढा होता. तो किती महत्त्वाचा होता, हे कळण्यास फार अवधी लागला नाही. १९४७, १९६५, १९७१, १९९६ अशी चार युद्धे पाकिस्तानबरोबर भारताला करावी लागली. १९६२मध्ये चीनच्या राज्यकर्त्यांनी एकीकडे शांततेची कबुतरे उडवत, दुसऱ्या बाजूला भारतावर आक्रमण केले आणि लष्करी पराभवाची नामुष्की सान्या देशाला सहन लागली. संरक्षण क्षेत्राची उपेक्षा केली तर काय होते, याचा देशाने दाहक अनुभव घेतला संदर्भात एखाद्या व्यक्तीचे मूल्यमापन करताना काळाच्या ओघात जे वास्तव नव्याने समोर येते, ते विचारात घ्यावे लागते. त्यातून आधीचे निष्कर्ष बदलावे लागतात; पण सावरकरांच्या बाबतीत दुर्दैवाने हेही घडले नाही. त्यांच्या बाबतीत विपर्यासाचा इतिहास थांबला नाही. जिथे विपर्यास शक्य झाला नाही, तिथे उपेक्षा आणि अनुल्लेखाचे अस्त्रही वापरले गेले.
एकूणच सावरकरांवर झालेल्या अन्यायाचा अभ्यासपूर्ण परामर्श शेषराव मोरे यांनी घेतला आहे. सावरकरांचा बुद्धिवाद: एक चिकित्सक अभ्यास आणि 'सावरकरांचे समाजकारण सत्य आणि विपर्यास है ग्रंथ जिज्ञासूंनी अवश्य वाचावेत.


सावरकरांनी देशहित डोळ्यांसमोर ठेवून आपली राजकीय व वैचारिक अवकाशातील भूमिका निश्चित केली आणि तिच्याशी ते प्रामाणिक राहिले. आपल्या 'वर्ल्ड व्ह्यू’ला अनुसरून समाजजीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करेल अशी परिपूर्ण वैचारिक मांडणी करून ते दार्शनिक होऊ शकले असते. तशी त्यांची क्षमताही होती. राजकारणात जिकडे चलती आहे, त्याच्याशी जुळवून घेत महत्त्वाचे स्थानही प्राप्त करून घेता आले असते; पण तसे न करता राष्ट्रवाद आणि संरक्षणाच्या विषयासंबंधी देशाला जागे करण्यासाठी त्यांनी अक्षरशः जंग जंग पछाडले.
शिक्षेसाठी अंदमानातील तुरुंगाकडे नेले जात असतानाही सावरकरांच्या मनात भावी भारताचे बलिष्ठ आरमार अंदमानच्या अंगणात पहारा करीत असल्याचे कल्पणातरंग उमटत होते. त्यांची नजर तेव्हापासून स्वतंत्र भारताच्या संरक्षण व्यवस्थेचा वेध घेत होती. नवस्वतंत्र देशाकडे जर अनुभवी, सुसज्ज सैन्यबळ नसेल, तर या देशाचे स्वातंत्र्य धोक्यात येऊ शकते, याची जाणीव त्यांना होती. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारतीयांनी सैन्यात सहभागी व्हावे, यासाठी ते आवाहन करीत होते. युद्धाचा अनुभव घेण्याची ही संधी आपले लष्कर अधिक समर्थ बनविण्यास कारणीभूत ठरेल, हे सावरकरांचे द्रष्टेपण


पण ते लक्षात न घेता त्यांच्यावर 'रिक्रूटवीर' अशी टीका झाली. भल्याभल्यांना सावरकरांच्या भूमिकांकडे निर्लेपपणे पाहता आले नाही. खरे म्हणजे स्वातंत्र्यानंतर काँग्रेसच्या राज्यकर्त्यांनी परिस्थितीच्या रेट्याने का होईना अनेक बाबतीत त्यांच्या विचारांचे अनुसरण केले. अर्थात त्यांचे नाव न घेता! संरक्षणाला देशाच्या धोरणात महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. विविध विद्यापीठांतून सामरिक शास्त्र या विषयावर अभ्यास आणि संशोधन सुरू आहे.


उपेक्षा, टीका आणि अवहेलना केवळ राजकीय क्षेत्रापुरती नव्हे. तर वैचारिक क्षेत्रातही सावरकरांच्या वाट्याला आली. त्यांचा बुद्धिवाद कमअस्सल ठरवणे; त्यांची विज्ञाननिष्ठा निव्वळ तंत्रज्ञानाच्या सामर्थ्यावर भाळलेली असल्याचा उपका ठेवणे; त्यांच्या समता प्रस्थापनेच्या चळवळीवरही हेत्वरोपाचा डाग लावणे, असे अनेक प्रकार झाले. साठ-सत्तरच्या दशकात महाराष्ट्रातील वैचारिक चर्चेत सावरकरांच्या वाट्याला ही आणि अशी अनेक दूषणे आली; पण त्या वेळी निदान ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात त्यांनी दिलेल्या लढ्याचे, त्यांच्या प्रयत्नांचे श्रेय नाकारण्याचा प्रकार घडला नव्हता. एकविसाव्या शतकात अलीकडे सहजपणे उपलब्ध होत असलेली 'विचारवंता'ची झुल पांघरलेल्या काहींनी तीही 'उणीव' भरून काढण्याचा चंग बांधला आहे. त्यांना 'माफीवीर' ठरवण्याचा खटाटोप चालवला आहे. अंदमानाच्या काळकोठडीतून सुटका करून घेण्यासाठी कसे प्रयत्न केले याची माहिती खुद्द सावरकरांनीच 'माझी जन्मठेप मध्ये कथन केली आहे. एवढेच नव्हे, तर जेव्हा जेव्हा त्यांच्या पराक्रमाविषयी काही अवाजवी लिहिले बोलले गेले, तेव्हा तेव्हा त्यांनी स्वतःच खुलासा करून याविषयीची नापसंती व्यक्त केली. ते स्वतःविषयीही अशा रीतीने कठोर होते. अनुयायी म्हणविणाऱ्यांनी पचतील तेवढेच सावरकर स्वीकारले, तर काहींनी त्यांना देव्हाऱ्यात बंदिस्त करण्याची सोयीची वाट घरली आणि टीकाकारांनी विरोधकांनी त्यांच्या कपाळावर ‘संकुचितते’ची तप्त मुद्रा कायमची ठोकून दिली. अंदमानातील त्यांच्या स्मृत्यर्थ लावलेला त्यांच्या चार ओळींचा स्मृतिफलकही यू.पी.ए. सरकारमधील मंत्र्याच्या डोळ्यावर आला आणि त्याने तो काढून टाकला. पण स्मृतिफलक काढला, तरी 'स्मृती' नाहीशा कशा होणार? त्या पुसण्याची ताकद मंत्रिपदाच्या सत्तेकडे नाही. जोवर साम्राज्यशाहीच्या विरोधातील लढे आशिया आफ्रिकेतील लाखो लोकांना प्रेरणा देत आहेत; जोवर भारताला जगात मानाचे स्थान मिळावे, ही इच्छा जिवंत आहे, जोवर भारतीय समाजात वैज्ञानिक दृष्टी रुजविण्याचे आव्हान कायम आहे आणि जोवर सर्वच धर्मातील गतानुगतिक आणि भ्रामक कल्पनांचा पगडा माणसाच्या प्रगतीच्या आड येत आहे. तोवर सावरकर कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्यासमोर येणारच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.