पुणे : गायक सलील कुलकर्णी एका कार्यक्रमात सांगत होते.. ते म्हणाले, "खूपदा मुलांना त्यांच्या मनातलं काहीतरी सांगायचं असतं. अगदी दोन मिनिटात संपेल अशी ती घटना असते. पण जेव्हा मुलं ती उत्साहाने तुम्हाला सांगायला येतात तेव्हा तुम्ही मात्र त्यांच्यावर सूचनांचा भडीमार करता. त्यांच्याकडे दुर्लक्ष करत मोबाईलमध्ये डोकं घालून बसता आणि त्यांना केव्हाची जी छोटीशी तुम्हाला सांगायची असते ती त्यांच्या मनातच राहून जाते.
लहान मुलांनी त्यांच्या त्यांच्या वयानुसार इतकं काही टिपलेलं असतं. इतकं काही निरीक्षण केलेलं असतं त्यांना ते कोणाला तरी सांगायचं असतं, जे प्रश्न पडलेले असतात त्यांची उत्तरे हवी असतात. पण पालक म्हणून आपण काय करतो? मी तुला वेळ देतो म्हणत शनिवार रविवार मॉलमध्ये घेऊन जातो, हॉटेलमध्ये जेवायला नेतो, एखादं महागडं खेळणं घेऊन देतो. पण मुलांना वेळ देण्याची ही व्याख्या असू शकते का हो? मला नाही वाटत.
त्यांना जे काही क्षण हवे असतात ते पूर्णपणे त्यांचे हवे असतात. माझ्याकडे बघ असे जेव्हा मुलं पालकांच्या हनुवटीला धरून सांगतात ना तेव्हा त्यांच्याकडे बघायला हवं. लॅपटॉपमध्ये नाही.
मुलांशी ‘संवाद साधा’ ‘संवाद साधा’ असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा मुलांशी बोलणं आणि त्यांचं ऐकणं सुद्धा गरजेचं असतं.!"
पण मुलांचं ऐकायचं म्हणजे नेमकं काय करायचं? त्यांना वेळ द्यायचा म्हणजे नेमकं काय करायचं? क्वालिटी टाइम कशाला म्हणायचं आणि मुलांच्या वाढीसाठी या सर्वच गोष्टी का आणि कशा गरजेच्या आहेत?
एक पालक म्हणून मला हे प्रश्न पडलेत.. तुम्हालाही हे प्रश्न पडले असतीलच कदाचित. यावर मिळून काही उत्तर शॊधता येतंय का ते पाहूया.