बाजे रे मुरलीया! `भारतरत्न` सन्मान मिळालेले दोन कलाकार एकत्र येतात तेव्हा...
काही गाणी, अल्बम विशेष असतात. `रामश्याम गुणगान` हा अल्बम अनेक अर्थांनी महत्त्वाचा. आठ विलक्षण गाणी यात आहेत म्हणून तर तो एकमेवाद्वितीय आहेच, पण त्यात लता मंगेशकर आणि पंडित भीमसेन जोशी हे `भारतरत्न` सन्मान मिळालेले दोन कलाकार एकत्र आले म्हणूनही तो महत्त्वाचा. यातल्या `बाजे रे मुरलीया` या गाण्याची एक गंमत आहे. त्यात लतादीदी आणि पंडितजी यांचा एकत्र आवाज असला, तरी प्रत्यक्षात ते एकत्र गायलेले नाहीत. काय आहे या गाण्याची कथा?
काही गाणी, अल्बम विशेष असतात. `रामश्याम गुणगान` हा असाच एक अल्बम. यातली गाणी पहिल्यांदा ऐकली होती तो काळ लख्ख आठवतो. कॉलेजमध्ये असताना दुसऱ्या गावांना वक्तृत्व स्पर्धांना जायचो. पहाटे उठायचं, आवरायचं आणि एसटीनं निघायचं असा प्रघात असायचा. इस्लामपूर, सांगली, कोल्हापूर, कऱ्हाड अशा गावांना जायचो. कधी बक्षीसं मिळायची, कधी मिळायची नाहीत, पण तरी या गावात स्पर्धेला जाऊन थडकायचंच अशी जिगर असायची. पहाटे उठायचो, तेव्हा आपसुकच पहिलं काम असायचं ते म्हणजे रेडिओ सुरू करणं. त्यात भक्तिसंगीत हा कार्यक्रम विलक्षण आवडता-कारण अनेक अनवट गाणी ऐकायला मिळायची. `रात्र काळी घागर काळी`, `माना मानव वा परमेश्वर` अशी किती तरी गाणी तेव्हा भेटली. ती गाणी, ते वातावरण, दुसऱ्या गावाला जायचे विचार, स्पर्धेचं टेन्शन, भाषणाचे मुद्दे लक्षात ठेवणं हे सगळंच अमूर्त मिश्रण त्यावेळी मनात जे काही तयार झालं, ते विलक्षण होतं. आजही यातलं एखादं गाणं जरी कानावर पडलं, की साताऱ्यातल्या रामाच्या गोटातल्या तळवलकर वाड्यातल्या दोन खोल्यांच्या घरात आतल्या खोलीत मी कधी जातो ते कळतच नाही. काय विलक्षण ना.
याच काळात ऐकलेलं हे गाणं. बाजे रे मुरलीया बाजे!!! पंडितजींच्या पहाडी आवाजानं तेव्हा कान टवकारले गेले आणि नंतर दीदींचा आवाज ऐकल्यावर तर सगळं काम थांबवून फक्त कानच सजग राहिले होते हेही आठवतंय. तेव्हा आजच्या काळासारखं गुगल नव्हतं लगेच माहिती मिळायला. ते गाणं पुन्हा ऐकण्याची संधीही नव्हती-कारण कॅसेटचा जमाना असला, तरी तेव्हा त्यासाठी वीस-पंचवीस रुपये घालवण्याची ऐपत नव्हतीच. त्यामुळे मग हेच गाणं पुन्हा कधी ऐकायला मिळेल यासाठी रेडिओकडे सतत कान असायचे. (Lata Mangeshkar and Pandit Bhimsen Joshi together performance)