राजू शेट्टींची दुसरी इनिंग शेतकऱ्यांना न्याय देणारी ठरेल का?
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनी नुकतीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन विधान परिषदेसाठी आपल्या नावाचा विचार करू नये, असे पत्र दिले. राज्यपालांना निवेदन दिल्याचे फोटो वर्तमानपत्रांतून छापून आले. राजू शेट्टी यांच्या यंत्रणेकडूनच हे फोटो वितरित झाले असतील. राज्यपालांना आपण भेटायला गेलो याचा डंका पिटवत राजू शेट्टी यांनी आपण पदासाठी हपापलेले कसं नाही, हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. राजू शेट्टी यांचा लढावू बाणा काय आहे आणि सत्तेबद्दल त्यांना प्रेम कसं नाही याबद्दलच्या कहाण्या गेल्या अडीच वर्षांत बऱ्याच सांगितल्या गेल्या. राजू शेट्टी यांना विधान परिषदेवर जाण्याची इतकी इच्छा नव्हती, तर महाविकास आघाडीने जेव्हा नावं सुचविली त्यावेळीच आपल्या संघटनेतील एखाद्या लढावू कार्यकर्त्याचं नाव राजू शेट्टी यांनी का सुचविलं नाही? महाविकास आघाडीतून आपण बाहेर पडलो याची जाहिरातबाजी करणाऱ्या राजू शेट्टींना गेल्या पाच वर्षांत अक्राळविक्राळ घोषणा आणि समाजात नको ते भेद पाडून, तसंच बेलगाम जातीयवादी विधानं करून वर्तमानपत्राची जागा व्यापण्यापलीकडे काय केलं, असा प्रश्न कोणी विचारला तर त्याचं काय उत्तर असेल? राजू शेट्टी यांनी काही दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांना संघटनेतून काढून टाकल्याची घोषणा केली.